मंचर: मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी काही प्रभागांमधील आरक्षणानुसार नगरसेवक पदासाठी कुणबी दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच नगराध्यक्ष पद ओबीसी राखीव जाहीर झाल्यामुळे संबंधित उमेदवारांकडून आवश्यक कागदपत्रांच्या मागणीत वाढ झाली आहे.
मात्र कुणबी दाखला काढून देण्याच्या प्रक्रियेत काही एजंट आणि महा-ई-सेवा केंद्रे अवाजवी पैशांची मागणी करू लागले आहेत. या प्रकारामुळे इच्छुक उमेदवार हैराण झाले आहेत.
उमेदवारी फॉर्म भरण्याची मुदत सोमवार (दि. 17)पर्यंत असल्याने उमेदवारांकडून मोठी धावपळ सुरू आहे. अर्ज दाखल करताना कुणबी दाखला जोडणे बंधनकारक असल्याचा गैरफायदा घेत काही केंद्रांनी शुल्काचे शासकीय दर 70 रुपये ऐवजी मनमानीपणे वाढवले. त्यानुसार 5 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अनेक उमेदवारांनी या संदर्भात तत्काळ चौकशी करून कठोर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे. वाढत्या आर्थिक शोषणामुळे प्रामाणिक उमेदवारांना अर्ज भरणेही कठीण झाले आहे.
कुणबी दाखला मिळण्यासाठी अतिरिक्त पैसे मागितले जात आहेत. सरकारी दर वेगळा आणि प्रत्यक्ष मागणी वेगळी म्हणजे आवाजवी असल्याने आम्ही अस्वस्थ आहोत. प्रशासनाने लगेच हस्तक्षेप करून ही आर्थिक लूट थांबवावी.प्रमोद बाणखेले, अध्यक्ष.
भाजपा उद्योग आघाडी, उत्तर पुणे जिल्हा.कुणबी दाखला घेण्यासाठी नियमानुसारच उमेदवारांनी किंवा इतर नागरिकांनी पैसे द्यावे. जर कोणी अडवणूक करून पैसे घेत असेल तर त्याची लेखी तक्रार तहसील कार्यालयात द्यावी. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.संजय नागटिळक, तहसीलदार, आंबेगाव