मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo)
पुणे

Kunbi certificate: खाडाखोड कागदपत्रांच्या आधारे कुणबी दाखले मिळणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

राज्य शासनाच्या सेवा पंधरवडा उपक्रमाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कुणबी दाखले मिळविण्यासाठी कागदपत्रांमध्ये खाडाखोड केली जात असल्याचे आरोप झाले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कुणालाही कुणबी दाखले देण्यात येणार नाहीत. (Latest Pune News)

राज्य शासनाच्या ‘सेवा पंधरवडा’ या उपक्रमाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले देण्यास सुरुवात झाली आहे का? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावर फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने याबाबत अध्यादेश काढला आहे. त्यानुसार जे पात्र आहेत त्यांनाच कुणबी दाखले मिळतील. किती जणांना आत्तापर्यंत दाखले मिळाले, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. मात्र, कुठेही दाखले दिले जात नसल्याची तक्रार आलेली नाही. योग्य कागदपत्रांची पडताळणी आणि स्थापन केलेल्या दोन समित्यांच्या अहवालांच्या आधारेच दाखले दिले जातील.

मंत्री छगन भुजबळ यांनी कागदपत्रांत छेडछाड करून कुणबी दाखले दिले जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, कागदपत्रांमध्ये खाडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे मूळ दाखले आहेत, त्यांच्याच नातेवाइकांना कायद्यानुसार दाखले मिळू शकतात. एखाद्याच्या दाखल्यावर आक्षेप असल्यास तक्रार करता येईल आणि त्यावर कारवाई केली जाईल. भुजबळ यांच्यासमोर काही प्रकरणे आली असतील तर त्यांनी त्यावर तक्रार दाखल करावी.

खेडकर कुटुंबाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “ते सापडतीलच, कुठे जाणार आहेत? स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार बुधवारी मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकारच्या घटना निषेधार्थ असून, पोलिस समजाकंटकाला शोधून योग्य ती कारवाई करतील. मात्र, या घटनेला राजकीय रंग देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रियाही फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला याला ठाम विरोध आहे. आवश्यकता भासल्यास महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि कर्नाटक सरकारविरोधात याचिका दाखल करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT