FSI Scam Pudhari
पुणे

Kothrud FSI Scam: कोथरूडमध्ये 50 कोटींचा एफएसआय घोटाळा; सोभा डेव्हलपर्ससह 4 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद; राखीव एफएसआयचा वापर करून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोथरूड येथील एका भूखंडाच्या एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) हक्कांमध्ये तब्बल ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंगळुरूस्थित सोभा डेव्हलपर्स लिमिटेड आणि कंपनीच्या चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाच्‍या आदेशानुसार कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सोभा डेव्हलपर्स लिमिटेड, कंपनीचे पदाधिकारी मनीष वर्मा (रा. विमाननगर), सुरजित चंदा (रा. कोथरूड) आणि जगदीश नांगिनेनी रवी मेमन (दोघेही रा. बंगळुरू) यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक रोहन किशोर पाटे (वय ३८, रा. सहकारनगर) यांनी तक्रार दिली आहे. मार्च २०१४ ते जून २०२६ दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन पाटे हे 'रोहन पाटे ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन एलएलपी'चे भागीदार आणि अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेड' चे संचालक आहेत. पाटे कुटुंबीयांच्या 'अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेड' या कंपनीसह जगदीश देशपांडे व इतरांची कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ७७/१ (पी) मधील सुमारे २७ हजार ४९९ चौरस मीटरसह २० हजार ८०३ चौरस फुटांची मालकी होती. त्यांही हा २०१४ मध्ये भूखंड बंगळुरूमधील 'सोभा डेव्हलपर्स' या बांधकाम कंपनीला १०५ कोटी रुपयांना विकला होता.

या व्यवहारात एक हजार ७५३.६२ चौरस मीटर एफएसआय फिर्यादी यांच्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक होते. मात्र, आरोपींनी एफएसआय राखीव न ठेवता संपूर्ण एफएसआयचा वापर केला. याबाबत उच्च न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयात विविध अर्ज व अपील करण्यात आले. उच्च न्यायालयाने या प्रकरणात एक हजार ७५३.६२ चौरस मीटरचा राखीव एफएसआय ठेवण्याचा आदेश सोभा डेव्हलपर्सला दिला होता.

मात्र, आरोपीच्या कंपनीने भूखंडावरील उपलब्ध एफएसआयपैकी जवळपास संपूर्ण एफएसआय वापरत केवळ ११.१५ चौरस मीटर एफएसआय शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राखीव एफएसआयचा वापर करून आपली ५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. न्यायालयाने कोथरूड पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल माने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT