पुणे: कोथरूडमधील संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीची भोंदूंनी तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भोंदू महिलेने अंगात दैवी संचार होत असल्याचे सांगून त्यांच्याकडून गेल्या सात वर्षांत लाखो रुपये उकळले. (Latest Pune News)
एवढेच नाही तर कोथरूड तसेच इंग्लंडमधील घरात दोष असून त्यांना घर, शेतजमीन विकण्यास भाग पाडले. घर विकल्यानंतर नातेवाईकांचे घर तारण ठेवून बँकेकडून कर्ज काढण्यास सांगितले. दरम्यान, एवढे करून देखील मुलींचा आजार बरा होत नाही हे पाहून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीने पोलिस आयुक्तालयात अर्ज दिला असून अद्याप याप्रकरणात गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संगणक अभियंता कोथरूडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत पत्नी, दोन मुलींसह वास्तव्यास असून एका आयटी कंपनीत कामाला आहे. त्यांची एक मुलगी मतिमंद असून, दुसऱ्या मुलीला दुर्धर विकाराने ग्रासले आहे. आर्थिक बाजू चांगली असताना दोन मुलींची प्रकृती चांगली नसल्याची खंत संगणक अभियंता आणि त्यांच्या पत्नीला होती. २०१८ पासून दोघे जण भजन मंडळात जायचे. भजन मंडळातील नागरिकांना त्यांच्या मुलींच्या आजारपणाविषयी माहिती होती.
त्यांनी संगणक अभियंत्याची ओळख एका व्यक्तीशी करून दिली. त्याने एका दाम्पत्यासोबत संगणक अभियंत्याचा परिचय करून दिला. 'संबंधित भोंदू महिला ही एका बाबांची लेक आहे. तिच्या अंगात बाबांचा संचार होतो', असे त्याने अभियंता आणि त्यांच्या पत्नीला सांगितले. ती महिला तुमच्यावरील सर्व संकटे दूर करतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर भोंदू महिलेने अभियंत्याची संपूर्ण माहिती घेतली. त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती तिने घेतली. भोंदू महिलेने दोन मुलींना घेऊन ओळख करून देणाऱ्या पहिल्या भोंदू व्यक्तीच्या दरबारात बोलाविले.
त्यावेळी तिने अंगात संचार आल्याचा बहाणा केला. अंगात संचार आल्याचा बहाणा करून २०१९ ते २०२१ या कालावधीत त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तुम्ही तुमच्या खात्यात पैसे ठेवू नका, असे सांगून तिने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. संगणक अभियंत्याने बँकेतील ठेवी माेडून तिच्या खात्यात पैसे जमा केले. मुलींचा आजार गंभीर असून, आजार बरा होण्यास वेळ लागेल, असे सांगितले. त्यानंतर मुली बऱ्या न झाल्याने संगणक अभियंत्याने विचारणा केली. तेव्हा तुमच्या घरात दोष आहे. घरातील दोषामुळे मुली बऱ्या होत नसल्याचे सांगितले. 'तु्म्ही घर विक्री करा. ही रक्कम तुमच्याकडे ठेऊ नका. ही रक्कम आमच्या खात्यात जमा करा. ही रक्कम घरात ठेवल्यास कोणाचाही मृत्यू होऊ शकतो, असे बाबांनी आम्हाला सांगितले आहे', असे तिने त्यांना सांगितले. भोंदू महिलेच्या सांगण्यावरून २०२२ मध्ये त्यांनी कोथरूडमधील घराची विक्री केली. ही रक्कम तिच्या खात्यात जमा करण्यात आली. बाबा दर्शन देणार आहेत, असे सांगून भोंदू महिलेने अभियंत्याला इंग्लंडमधील घर विक्री करण्यास सांगितले.
अभियंता राहत असलेली आणखी एक सदनिका, शेतजमिनीत दोष असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी कोथरूडमधील आणखी एक सदनिका, इंग्लंडमधील घर, शेतजमिनीची विक्री केली. पाॅलिसीत गुंतविलेली रक्कम त्यांनी तिला दिली. त्यानंतर आणखी रक्कम मागितली. मुली बऱ्या होतील, या आशेने त्यांनी भावाचे घर तारण ठेवून पैसे दिले. गेल्या सात वर्षांत भोंदू महिला, तिचा पती आणि साथीदारांनी आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर संगणक अभियंत्याने पोलिस आयुक्तयालयात नुकताच तक्रार अर्ज दिला.
या प्रकरणाची तक्रार अद्याप कोथरूड पोलिस ठाण्यात आलेली नाही. याबाबतचा तक्रार अर्ज पोलिस आयुक्तालयात देण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने विविध बाबी तपासण्यात येत आहेत. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही.संदीप देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे