प्रभाग १४ मध्ये चुरस वाढली; ‌‘क्रॉस व्होटिंग‌’वर ठरणार विजयाचे गणित Pudhari
पुणे

PMC Election Politics: प्रभाग १४ मध्ये चुरस वाढली; ‌‘क्रॉस व्होटिंग‌’वर ठरणार विजयाचे गणित

कोरेगाव पार्क–घोरपडी–मुंढवा प्रभागात युती, आघाडी आणि गटबाजींच्या समीकरणामुळे निवडणुकीत रंगणार काँटे की टक्कर

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 14 कोरेगाव पार्क- घोरपडी-मुंढवा

मुंढव्यात कोण येणार आमने-सामने? मुंढवा हा भाग आता प्रभाग 14 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. 2017च्या निवडणुकीमधील भाजपच्या कै. लता धायरकर व उमेश गायकवाड, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे व बंडूतात्या गायकवाड हे विद्यमान नगरसेवक होते. सध्या यातील बंडूतात्या गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट, तर पूजा कोद्रे ह्या शरद पवार गटात आहेत. या वेळी कै. लता धायरकर यांचे चिरंजीव किशोर धायरकर हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या चौघांपैकी कोण आमने-सामने असणार, याची नागरिकांना उत्सुकता आहे.(Latest Pune News)

मागील निवडणुकीच्या तुलनेत

या प्रभागाचे भौगिलिक आणि राजकीय चित्र आता बदलले आहे. कोरगाव पार्क येथील ताडीवाला रोडचा भाग कमी करून नव्याने मुंढवा आणि मगरपट्टा सिटीच्या काही भागांचा या प्रभागात समावेश करण्यात आला आहे. प्रभागात विविध राजकीय पक्षांचे प्राबल्य असल्यामुळे

‌‘क्रॉस व्होटिंग‌’ होण्याची शक्यता असून, त्याचा फायदा कुणाला होणार? याबाबत नागरिकांत चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रभागात अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण झाले आहे.

प्रभागातून पूर्वीच्या प्रभागातील

(क्र. 21) कोरेगाव पार्क येथील ताडीवाला रोडचा भाग वगळण्यात आला आहे, तर मुंढवा आणि मगरपट्टा हा भाग नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. आता या प्रभागाची लोकसंख्या 92,092 इतकी आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून कै. लता धायरकर, मंगला मंत्री, उमेश गायकवाड आणि हिमाली कांबळे हे चारही भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. आता या प्रभागात भाजपचे चार उमेदवार लढणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती झाल्यास उमेदवारी कुणाला दिली जाणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 2017 सारखी स्थिती आता या प्रभागात नाही. क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याचा फायदा कुणाला होणार? याबाबतच्या तर्क-वितर्कांची चर्चा नागरिकांत सध्या सुरू आहे.

या भागातून 2012 ते 2017 या कालावधीत दोनसदस्यीय प्रभाग असताना घोरपडी येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा कवडे आणि अण्णा म्हस्के, तर कोरेगाव पार्कमधून मनसेचे बाबू वागसकर आणि वनिता वागसकर हे निवडून आले होते. 2017 मध्ये हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आताही ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या वेळी ते भाजपच्या उमेदवारांना कशी टक्कर देतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे पंकज कोद्रे हे निवडणुकीसाठी इच्छुक असून, ते भाजप युतीबरोबर लढतात की त्यांचा स्वतंत्र पॅनेल असणार, हे अद्याप निश्चित नाही. या प्रभागात मनसे व शिवसेना ठाकरे गटाचेही चांगले प्राबल्य आहे. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगळे लढले होते. दोन्हीही वेळेच्या त्यांच्या मतांची बेरीज केल्यास ती संख्या त्या वेळच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त होती. हे दोन्ही पक्ष आता एकत्र लढल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ‌‘काँटे की टक्कर‌’ देतील, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. घोरपडी व मुंढवा येथे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे पूर्वीपासून प्राबल्य आहे. हे दोन पक्ष मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाबरोबर लढणार की वेगळे लढणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. हे चार पक्ष एकत्र आल्यास निवडणुकीमध्ये आणखी चुरस निर्माण होणार आहे. मात्र, याविषयी अद्याप निर्णय झाला नसल्याने या पक्षांचे इच्छुक सध्या ‌‘वेट अँड वॉच‌’वर आहेत.

मागील दोन पंचवार्षिकमध्ये या प्रभागात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. कोरेगाव पार्कमध्ये मनसेची ताकद आहे. या प्रभागातील जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या ही घोरपडी व भीमनगर परिसरातील आहे. सर्वधर्मीय नागरिक असलेल्या या प्रभागात तमीळ, तेलगू, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांतील नागरिकांबरोबरच बौद्ध आणि मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे. या मतदारांवरही उमेदवारांचा जय-पराजय अवलंबून आहे. युती व आघाडीची समीकरणे कशी असतील, यावरच पॅनेल कसे असतील, हे ठरणार आहे.

भाजप

किशोर धायरकर, मंगला मंत्री, उमेश गायकवाड, हिमाली कांबळे, अभिजित वाघचौरे, आशिष भोसले, जयदेव रंधवे

राष्ट्रवादी शरद पवार गट

पूजा कोद्रे, मकरंद देशमुख, सोमनाथ आप्पा शिंदे, निवास लादे

काँग्रेस पक्ष

प्रदीप परदेशी, संगीता तिवारी, प्रशांत जाधव,

सुभाष सरोदे, गणेश कवडे

राष्ट्रवादी अजित पवार गट

सुरेखा कवडे, बंडूतात्या गायकवाड, गौरी पिंगळे, अण्णा म्हस्के, यशवंत नडगम, अजय पाटोळे, रवींद्र कवडे, संतोष कवडे

शिवसेना ठाकरे गट

अतुल कवडे, नितीन निगडे, वीरेंद्र गायकवाड, विजय पालवे, रमेश क्षीरसागर, विल्सन धनपाल, सुनील ऊर्फ आप्पासाहेब गायकवाड, धैर्यशील गायकवाड

आम आदमी पार्टी

अभिजित गायकवाड, शिवाजी डोलारे, फॅबियन सॅमसन

शिवसेना (शिंदे गट) : पंकज कोद्रे

वंचित बहुजन आघाडी : अजित वाघमारे

इतर इच्छुक : स्वप्निल गायकवाड, शिवाजी पवार, मनोज प्रक्षाळे, उमाकांत म्हस्के, रमाकांत म्हस्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT