राहू: कोरेगाव भिवर ते वाळकी फाटा यादरम्यान केलेल्या वांधारा रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदाराने कमालीचा हलगर्जीपणा केला आहे. त्याने ओढ्यावर नवीन पूल बांधण्याऐवजी जुन्याच ओढ्यावर काम केले. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सुपीक माती वाहून जमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा प्रकार लक्षात आणून दिला, तरी अधिकारीवर्गात चुप्पी असल्याचे दिसून येते. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कोरेगाव भिवर ते वाळकी फाटा रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले. नियमानुसार ओढ्याच्या ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नवीन पूल किंवा मोठी मोरी बांधणे आवश्यक होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने या तांत्रिक बाबीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. ओढ्यावरील नवीन पूल न करता जुन्याच जागेवर काम करण्यात आले. दुर्दैवाने जुन्या मोरीच्या नळ्या मातीने पूर्णपणे गाडल्या गेल्या. त्यामुळे पावसाळ्यात ओढ्याला आलेले पाणी पुढे जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की शेतातील माती वाहून गेली आहे.
या गंभीर प्रकारानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी ठेकेदार टी. देवकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी महेंद्र कांबळे यांना जागेवर नेऊन वस्तुस्थिती दाखवली होती. मात्र, नुकसान दिसत असूनही या दोघांनीही याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही, असा गंभीर आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या या ’अर्थपूर्ण चुप्पी’मुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नुकसानग््रास्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत बाधित शेतकरी बंडु खेडेकर, बाळासाहेब खेडेकर आणि प्रदीप खेडेकर यांनी आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराला येथील मोरीबाबत वारंवार विनंती केली होती.
नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी काहीही ऐकले नाही. जुन्या मोरीच्या नळ्या मातीने गाडल्याने पाण्याचा प्रवाह बदलला आणि आमची शेतजमीन वाहून गेली. यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी; अन्यथा तीव आंदोलन करू, असाही इशारा त्यांनी दिला आहे.