Fire Pudhari
पुणे

Kondhwa Parking Fire: पुण्यातील कोंढव्यात पार्किंगला भीषण आग; १८ वाहने जळून खाक, ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका

भाग्योदयनगरमधील चार मजली इमारतीत पहाटेची घटना; अग्निशमन जवानांनी २० मिनिटांत आगीवर मिळवले नियंत्रण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात पहाटेच्या सुमारास पार्किंगमधील वाहनांना लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. तळमजल्यावरील पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत तब्बल १८ वाहने जळून खाक झाली. आगीचा धूर चार मजली इमारतीत पसरल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अग्निशमन जवानांनी तत्काळ धाव घेत सुमारे ३५ रहिवाशांना सुरक्षितपणे गच्चीवर हलविले. त्यानंतर धुरात शिरून अवघ्या २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

कोंढवा, गल्ली क्रमांक ३४, भाग्योदयनगर येथील चार मजली इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये रविवारी पहाटे ३ वाजून १९ मिनिटांनी वाहनांना आग लागल्याची स्थानिक रहिवासी शाखीबाली यांनी अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार, कोंढवा अग्निशमन केंद्रातील तीन वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली. जवान घटनास्थळी पोहोचले, तेव्हा पार्किंगमध्ये आगीने रौद्र रूप धारण केले होते.

मोठ्या प्रमाणात धूर इमारतीत पसरल्याने रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला. जवानांनी प्रथम रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याला प्राधान्य दिले. जवळपास ३५ रहिवाशांना गच्चीवर सुरक्षितपणे नेण्यात आले. त्याच वेळी श्वसनयंत्र परिधान करून जवानांनी धुरातून आत प्रवेश करत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. पार्किंगमधील वाहनांनी पेट घेतल्याने आग अधिक भडकण्याची शक्यता होती.

मात्र, जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग शेजारील इमारतीपर्यंत पोहोचू दिली नाही. सतत पाण्याचा मारा करीत २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत १६ दुचाकी, एक तीनचाकी आणि एक चारचाकी वाहन जळाले. तसेच इमारतीच्या लिफ्टचे आणि विद्युत वायरिंगचे मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अग्निशमन मोहिमेत वाहनचालक राहुल जाधव, राहुल मखरे तसेच जवान सागर दळवी, रितेश मोरे, शैलेश दवणे, अभिजित थळकर, तेजस खरिवले, राहुल दळवी, संतोष माने, प्रसाद शिंदे, सूरज माळवदकर, अक्षय चव्हाण आणि अभिषेक कसबे यांनी सहभाग घेतला.

पहाटे आम्हाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही ही घटनास्थळी पोहचलो. तेथे माहिती घेतल्यानंतर समजले की या इमारतीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक वाहने ही होती. चार्जिंगला वाहन लावल्यानंतर शॉर्टसर्किट झाले असण्याची शक्यता असू शकते. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.
प्रशांत मंडले, पोलिस निरीक्षक, कोंढवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT