Illegal liquor sale Pune Pudhari
पुणे

Illegal liquor sale Pune: कोंढव्यात बेकायदा दारूविक्रीचा भंडाफोड; घरझडतीत सापडले कोट्यवधींचे नोटांचे बंडल

महिलेवर गुन्हा दाखल; दारूच्या साठ्यासह १ कोटींहून अधिक रोकड जप्त, प्राप्तिकर विभागालाही पाचारण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोंढवा परिसरात बेकायदा दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिच्या घराची झडती घेताना कोंढवा पोलिसांना घरातील एका कपाटात नोटांचे मोठ्या प्रमाणात बंडल सापडले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी नोटांची मोजदाद केली असता, सुमारे एक कोटी रुपयांचा आकडा समोर आला.

अमर कौर ऊर्फ मद्रीसिंग दादासिंग जुनी (वय 55), दिलदारसिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी यांच्यावर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 1 कोटी 85 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक परिसरात व्हीआयआयटी कॉलेजकडून अप्पर इंदिरानगरकडे जाण्याच्या रस्त्यावर काकडेवस्ती आहे. हा संपूर्ण वस्ती भाग आहे. येथील गल्ली क्रमांक दोनमध्ये अमर कौर राहते. या वस्तीत ती बेकायदा गावठी दारूची विक्री करते. पोलिसांनी यापूर्वीही तिच्यावर कारवाई केलेली होती. काकडेवस्ती येथे अमर कौरच्या घरी पुन्हा बेकायदा दारूविक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सायंकाळच्या सुमारास तपास पथकाने काकडेवस्तीत संबंधित महिलेच्या घरावर छापा टाकला.

या छाप्यात सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याकडे काही प्रमाणात रोकड आढळून आली. त्यामुळे पुढील तपासासाठी घराची सखोल झडती घेतली असता, बेडरूममधील कपाटात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली. या कारवाईमुळे कोंढवा परिसरात बेकायदा दारूविक्रीबरोबरच काळ्या पैशांच्या व्यवहारावरही प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत असून, आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नोटा मोजण्यासाठी पोलिसांनी तत्काळ नोटा मोजण्याचे मशिन मागवले. रात्री उशिरापर्यंत नोटांची मोजणी पूर्ण झाली. एक कोटींहून अधिक रक्कम असल्याचे स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड तिच्या घरात कशी आणि कोणत्या मार्गाने आली, याबाबत ती समाधानकारक माहिती देऊ शकली नाही. त्यामुळे रोकडच्या स्रोताबाबत संशय अधिक बळावला. रोकड मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने कोंढवा पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला पाचारण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT