Ganesh Idols Pune Pudhari
पुणे

Ganesh Idols Pune: गणरायाच्या मूर्ती साकारण्याची कारागिरांची लगबग; पुण्यासह महाराष्ट्राबाहेरही मागणी

कोंढव्यातील बाप्पाच्या सुबक मूर्ती पंजाब, दिल्लीला जाणार

पुढारी वृत्तसेवा

सुरेश मोरे

कोंढवा: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरासह उपनगरांमध्ये गणरायाच्या मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. कोंढवा परिसरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या दिवसरात्र काम सुरू असून, विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपातील गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्याची लगबग सुरू आहे.

विशेष म्हणजे, कोंढव्यात तयार होणाऱ्या सुबक आणि देखण्या गणेशमूर्तींना पुण्यासह महाराष्ट्राबाहेरही मोठी मागणी असून, यंदा पंजाब आणि दिल्लीमध्येही या मूर्ती रवाना होणार आहेत.

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, रंग, सजावटीचे साहित्य तसेच वाहतूक आणि मजुरीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मूर्ती तयार करण्याचा खर्च वाढला असला, तरी भक्तांच्या श्रद्धेचा आणि गणेशोत्सवाच्या परंपरेचा विचार करून मूर्तींच्या किमती वाढवण्यापेक्षा शक्य तितक्या वाजवी दरात मूर्ती देण्याचा प्रयत्न असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत.

कोंढव्यातील ज्येष्ठ मूर्तिकार पांडुरंग लोणकर म्हणाले, महागाई वाढली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढला आहे. मात्र, बाप्पाच्या मूर्ती विकताना नफा-तोट्याचा फारसा विचार आम्ही करत नाही. भक्तांना त्यांच्या आवडीची सुंदर मूर्ती योग्य दरात मिळावी, हीच आमची भावना आहे. त्यामुळे शक्यतो मूर्ती ना नफा, ना तोटा अशा पद्धतीने देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

लोणकर यांच्या कार्यशाळेत सध्या गणेशमूर्तींच्या विविध आकारांवर काम सुरू असून, मूर्तींची रंगरंगोटी, डोळ्यांची आखणी, दागिने आणि आकर्षक सजावट यावर विशेष भर दिला जात आहे. प्रत्येक मूर्तीला आकर्षक आणि जिवंत स्वरूप देण्यासाठी मूर्तिकार आणि त्यांचे सहकारी बारकाईने काम करत आहेत.

कोंढवा परिसरात तयार होणाऱ्या गणेशमूर्तींची सुबकता, कलात्मकता आणि आकर्षक रंगसंगती यामुळे पुणे जिल्ह्याबरोबरच इतर राज्यांमधूनही मागणी वाढत आहे. यंदा पंजाब आणि दिल्लीतील गणेशभक्तांसाठीही मूर्ती तयार केल्या असून, त्या गणेशोत्सवापूर्वी सुरक्षितपणे रवाना करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोंढव्यातील गणरायाची कला महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाच्या विविध भागांत पोहोचत आहे.

दरम्यान, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून अनेक मूर्तिकार आणि कारागिरांच्या कष्टाला रोजगार देणारा महत्त्वाचा सण आहे. वर्षभर गणेशमूर्तींच्या कामाची तयारी करणाऱ्या या कलाकारांसाठी गणेशोत्सवाचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. वाढत्या महागाईच्या काळातही श्रद्धा, परंपरा आणि कलेची जपणूक करत गणरायाच्या मूर्ती भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम कोंढव्यातील मूर्तिकार पांडुरंग लोणकर व अजय बुलबुले करत आहेत.

कार्यशाळांमध्ये विविध कामे

मूर्ती वेळेत पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांकडून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम सुरू आहे. एका बाजूला मूर्तींची घडण आणि रंगकाम, तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तींची सजावट व पॅकिंग अशी विविध कामे कार्यशाळांमध्ये सुरू आहेत.

बाप्पाची मूर्ती विकणे हा आमच्यासाठी केवळ व्यवसाय नाही; ही आमची कला आणि श्रद्धा आहे. भक्तांच्या घरी सुंदर बाप्पा विराजमान झाला, हेच आमच्यासाठी समाधान आहे.
- पांडुरंग लोणकर, मूर्तिकार, कोंढवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT