Diwali Mud Forts Pudhari
पुणे

Kondhwa Diwali Mud Forts: शहरीकरणाच्या विळख्यात मातीचे किल्ले हरवले! कोंढव्यातील चिमुकल्यांना ऑनलाइन खरेदीचा आधार

मोकळ्या जागांचा अभाव अन् लाल मातीची टंचाई; दिवाळीतील शिवकालीन किल्ल्यांची परंपरा जपण्याचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

कोंढवा: दिवाळी आणि मातीचा किल्ला हे अतूट समीकरण आहे. दिवाळीच्या सुटीत अंगणात किंवा मोकळ्या जागेत मित्रमंडळींसोबत लाल मातीचा किल्ला उभारणे, त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, मावळे, तोफा, तटबंदी आणि भगवे झेंडे लावणे, हा बालपणीच्या दिवाळीचा अविभाज्य भाग होता.

मात्र, झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि मोकळ्या जागांचा अभावामुळे आता लाल मातीच दुर्मीळ झाली आहे. परिणामी, कोंढव्यातील चिमुकल्यांना दिवाळीचे किल्ले उभारण्यासाठी ऑनलाइन खरेदीचा आधार घ्यावा लागत आहे.

कोंढवा परिसरात मोठमोठ्या गृहप्रकल्पांची उभारणी, रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि मोकळ्या जागांवर वाढते बांधकाम यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागा मिळणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत किल्ला बनविण्यासाठी आवश्यक असलेली लाल माती शोधणे हे पालकांसाठीही आव्हान ठरत आहे. लाल माती सहज उपलब्ध होत नसल्याने आता अनेक पालक ऑनलाइन माध्यमातून किल्ल्यांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.

मातीचा किल्ला हा केवळ खेळ नसून, स्वराज्याच्या इतिहासाची ओळख करून देणारा संस्कार आहे. ही परंपरा जपण्यासाठी सोसायट्यांनी सामूहिक किल्ले बांधणीचे उपक्रम, तर शाळांनी किल्ले स्पर्धा आणि कार्यशाळा आयोजित कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT