पुणे : डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीतून एका तरुणाला बोलावून त्याच्याकडील दागिने आणि रोकड असा 80 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना कोंढव्यात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 27 वर्षीय तरुण नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात राहायला आहे. 11 जानेवारी रोजी तो मोबाईलवर एक डेटिंग ॲप पाहत होता. त्या वेळी एकाने त्याला संदेश पाठविला. त्यानंतर तक्रारदार तरुणाने त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. ’कोठे राहतो?’ अशी विचारणा तरुणाने त्याच्याकडे केली. त्यानंतर आरोपीने रात्री नऊच्या सुमारास कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंपाजवळ तरुणाला भेटायला बोलावले. त्या वेळी तीन तरुण तेथे थांबले होते. तरुणांनी त्याला शस्त्राचा धाक दाखविला.
कोंढव्यातील पानसरेनगर परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत तरुणाला घेऊन गेले. त्याला शिवीगाळ करीन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्याकडील मोबाईल संच, अंगठी काढून घेतली. तरुणाला धमकावून एटीएममधून पैसे काढण्यास सांगितले. तरुणाकडील रोकड, मोबाईल संच, अंगठी असा ऐवज काढून घेतला.
या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन तिघे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचे वय अंदाजे 20 ते 22 वर्षे असल्याचे तक्रारदार तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणाने नुकतीच कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शीतल पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.