ना लिफ्ट, ना रॅम्प वयोवृद्धांनी पोलिस चौकीत जायचं कसं? Pudhari
पुणे

Kishkindanagar Police Station: ना लिफ्ट, ना रॅम्प वयोवृद्धांनी पोलिस चौकीत जायचं कसं? किष्किंदानगरमधील ज्येष्ठ नागरिकांचा सवाल

दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी चढाव्या लागतात वीस-बावीस पायर्‍या

पुढारी वृत्तसेवा

पौडरोड: पुरोगामी राज्य म्हणून देशभर बिरुद मिरविणार्‍या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत मात्र महिला पोलिस अधिकार्‍यांची चणचण भासत आहे. पौडरोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आली. परिसरात रात्रीच्या सुमारास गाड्यांची तोडफोड, महिला, विद्यार्थिनींवरील छेडछाडीचे प्रकार, हाणामारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

मात्र, अत्याचार व छेडछाडीचे गार्‍हाणे ऐकण्यासाठी किष्किंदानगर पोलिस चौकीत एकही महिला अधिकारी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी, तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला- युवतींची कुचंबणा होत आहे. (Latest Pune News)

त्याचप्रमाणे ही चौकी दुसर्‍या मजल्यावर असल्याकारणाने ज्येष्ठ नागरिकांना आपली तक्रार देण्यासाठी वीस-बावीस पायर्‍या चढून जावे लागत आहे. तेथे ना लिफ्ट, ना रॅम्प त्यामुळे वयोवृद्धांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच, स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

कोथरूड हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. या भागात नामांकित शाळा, महाविद्यालये असल्याने या ठिकाणी लाखो विद्यार्थी व कामगार येतात. कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांना ताण सहन करावा लागत होता. या भागात अनेकवेळा गाड्यांची तोडफोड- जाळपोळ, चोरीसही महिलांचीदेखील छेडछाड होत होती. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी नव्या स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज होती.

किष्किंदानगरमधील नागरिकांची मागणी व गरज लक्षात घेऊन डिसेंबर 2009 ला पोलिस चौकीला मान्यता मिळाली. जागेअभावी चार वर्षांनंतर माजी नगरसेवक रामचंद्र ऊर्फ चंदुशेठ कदम यांच्या निधीच्या माध्यमातून महापालिकेचे समाज मंदिर विठ्ठल मंदिराच्या वर जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्या अनुसार फेब्रुवारी 2013 मध्ये सुरू करण्यात आली.

महिलांना प्राधान्य देत त्यांच्या तक्रारीदेखील महिला पोलिसांनीच घ्याव्यात, असे नियम गृहखात्याने तयार केले आहेत. मात्र, महिला पोलिस अधिकारीच नसल्याने त्या सर्व तक्रारी व तपास करण्याची वेळ पुरुष पोलिस अधिकार्‍यांवर आली आहे.

महिला पोलिस अधिकार्‍यांची गरज

पोलिस ठाण्यात महिला अधिकारी असल्यास महिला तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे जाण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. ती तिच्या समस्यांबद्दल उघडपणे बोलू शकते. पुरुष अधिकार्‍यांसमोर एक स्त्री तिच्या सर्व समस्या उघड करू शकत नाही. महिला पोलिस अधिकारी विनयभंग आणि बलात्काराची प्रकरणे अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात.

महिलांची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे, त्या अनुसार महिला पोलिस अधिकारी दिले जातील. महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी महिला बिट मार्शलदेखील चौकीला असतात.
- संदीप देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT