प्रसाद जगताप
पुणे: शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध महत्त्वाच्या रस्त्यांवरील चौकात उभारण्यात येत असलेले उड्डाणपुलांचे काम येत्या काही दिवसांतच पूर्ण होत आहे. परिणामी, सदैव वाहतूक कोंडीसाठी ओळखले जाणारे कात्रज, पुणे विद्यापीठ आणि सिंहगड रस्त्यावरील चौक लवकरच कोंडीमुक्त होणार आहेत.
या कामांच्या प्रगतीचा आढावा पुढारीने नुकताच घेतला. त्यानुसार या वर्षाच्या अखेरीस आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला हे पूल वाहतुकीसाठी खुले होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठासमोरील पूल दिवाळीत होणार वाहतुकीसाठी खुला? (Latest Pune News)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील तीनपैकी एक लेन म्हणजेच एक बाजू (औंध ते शिवाजीनगर) नुकतीच खुली करण्यात आली. उर्वरित दोन बाजूचे (बाणेर, पाषाणकडील बाजू) काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होत आहे. त्यामुळे दिवाळीत हा संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या पुलाची एक बाजू नुकतीच खुली झाल्याने औंध रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होऊन वाहतुकीचा वेगही वाढला आहे.
पुलाचे सर्व खांब उभारले
कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम 60 टक्के झाले असून, डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण पूल तयार होईल. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी शक्यता आहे.
सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त मिळेना?
सिंहगड रस्त्यावरील गोयल गंगा परिसरातील खाऊ गल्लीपासून सुरू होणार्या व हिंगणे पेट्रोलपंप परिसरात उतरणार्या उड्डाणपुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पुलाचे उद्घाटन कधी होणार असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारला जात आहे.
वैशिष्ट्यपूर्ण डबल डेकर पूल
पुलाची लांबी - 1763.52 मीटर
शिवाजीनगर रॅम्प लांबी - 174.00 मीटर
औंध रॅम्प लांबी -210.00 मीटर
बाणेर रॅम्प लांबी - 151.00 मीटर
पाषाण रॅम्प लांबी - 116.00 मीटर
प्रकल्पाची किंमत - 277 कोटी
द़ृष्टिक्षेपात...
कामाला सुरुवात - दि. 25 फेब—ुवारी 2022
लांबी - 1.326 मी.
रुंदी - 25.20 मी.
कात्रज चौक ते राजस सोसायटी दरम्यान असणार पूल
खांबांची संख्या - 20 खांब
एकूण खर्च - 104.97 कोटी
आत्तापर्यंतचा खर्च - सुमारे 48 कोटी