खडकवासला : सिंहगड रस्त्यावरील दाट लोकवस्तीच्या किरकटवाडीतील उपेक्षित नागरिकांना चाळीस वर्षांनंतर अंतर्गत पक्का रस्ता मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव दत्तात्रय कोल्हे व खडकवासला भाजपच्या सरचिटणीस धनश्री कोल्हे यांनी अथक प्रयत्नातून हा सिमेंट काँक्रीटचा अतंर्गत रस्ता तयार केला आहे. रस्त्याची गैरसोय दूर झाल्याने रहिवाशांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
या परिसरात चाळीस वर्षांपासून राहणारे सिताराम कोल्हटकर म्हणाले, आमच्या दारापर्यंत आज रस्ता होईल म्हणून आम्ही चाळीस वर्षांपासून याचना करत होतो. मात्र, कोणीही दखल घेतली नाही. बारमाही पक्का रस्ता झाल्याने या परिसरातील लोकवस्त्या, सोसायट्यांतील रहिवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
अंतर्गत रस्त्यावर पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात प्रचंड धुळीमुळे नागरिकांना अत्यंत हालाखीला तोंड द्यावे लागत होते. कोल्हे दाम्पत्याने त्याची दखल घेत अवघ्या तीन दिवसांत कायमस्वरूपी प्रशस्त सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला. गाजावाजा न करता या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी कोल्हे दाम्पत्यासह सिताराम कोल्हटकर, अॅड. श्रीनाथ राऊत, कृष्णाजी राऊत, बाळासाहेब निगडे, कैलास निगडे, पोपट निगडे, गजानन तनपुरे, आदी उपस्थित होते.