शिरूर : कारेगाव (ता. शिरूर) येथे बाहेर जाताना सांभाळण्यासाठी दिलेल्या तीनवर्षीय बालकाचे अपहरण करून त्याला घेऊन गेलेल्या दाम्पत्याला लुधियाना (पंजाब) येथून सुखरूप पकडले. या वेळी तीन वर्षांच्या मुलाची सुटका करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले. परप्रांतीय दाम्पत्याने बालकाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत पोलिसांनी आरोपींना पंजाबमध्ये जाऊन जेरबंद केले. (Latest Pune News)
पूजादेवी ऊर्फ वनिता यादव (वय 37) व अर्जुनकुमार यादव (वय 36) अशी अटक केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. पोलिस चौकशीत आरोपींनी मुलबाळ नसल्याने व बालकावर आपुलकी जडल्याने त्याचे अपहरण केल्याचे कबूल केले आहे.
कारेगाव (ता. शिरूर) येथे काजल महेंद्र पडघाण या आपला भाऊ व 3 वर्षीय मुलगा आयुषसोबत वास्तव्यास आहेत. कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर मुलाला सांभाळण्यासाठी त्यांनी शेजारी राहणार्या पूजादेवी यादव या परप्रांतीय महिलेकडे आयुषला सोपविले होते. परंतु, शुक्रवारी (दि. 12) नेहमीप्रमाणे मुलाला दिल्यानंतर संध्याकाळी परत आल्यावर मुलगा व यादव दाम्पत्य गायब असल्याचे लक्षात आले. दोन दिवस वाट पाहूनही ते परत न आल्याने अखेर सोमवारी (दि. 15) रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली.
गुन्हा नोंद होताच पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी वरिष्ठांना कळवून तातडीने तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व स्थानिक पोलिसांच्या मदतीने यादव दाम्पत्य पंजाब राज्यातील लुधियाना येथे असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ तपास पथक पंजाबमध्ये रवाना झाले व तेथील पोलिसांच्या मदतीने आरोपी पूजादेवी ऊर्फ वनिता यादव आणि अर्जुनकुमार यादव यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीनवर्षीय आयुषची सुखरूप सुटका केली.