

नानगाव : हातवळण (ता. दौंड) येथील राहुल सुरेश पवार यांच्या घरी असणार्या शेळीवर मंगळवारी (दि. 16) रात्री 16 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात शेळी जागेच ठार झाली असून, पवार यांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, त्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला आहे. (Pune Latest News)
राहुल पवार हे हातवळण (ता. दौंड) येथील पवार वस्तीवर आपल्या कुटुंबासह राहत आहे. घरातील सगळे झोपी गेले असता रात्री बारा वाजता अचानक शेळी ओरडण्याचा आवाज आला शेळी का ओरडली हे पाहण्यासाठी सुरेश पवार घराच्या बाहेर आले असता त्यांनी बिबट्याला शेळीवर हल्ला करताना पाहीले.
प्रसंगावधान बाळगत सुरेश पवार यांनी या बिबट्याला आरडाओरडा करत हुसकावण्याचा प्रयत्न केला. शेळी बांधली असल्यामुळे बिबट्याला ओढून नेता आली नाही. मात्र, शेळीच्या गळ्यावरती बिबट्यांच्या दाताचा मोठा घाव झाल्याने शेळी जागीच ठार झाली. सकाळी वन विभागाचे कर्मचार्यांनी पाहणी केली असता त्यांना या परिसरात बिबट्याचे ठसे तसेच शेळीच्या गळ्याला झालेली जखम दिसली . वन कर्मचार्यांनी पंचनामा केला. या वेळी स्थानिकांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
अनेक वर्षापासून वावर
नानगाव, हातवळण या भागात गेली अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आढळून येत आहे. मागील महिन्यातच नानगाव येथे एका लोखंडी फासामध्ये बिबट्या अडकला होता तसेच त्यानंतर नानगाव येथील दुरेकरवस्ती परिसरात बिबट्याने दोन शेळ्यांवरती हल्ला चढविला होता तसेच एक महिन्यानंतर पुन्हा हातवळण येथे ही घटना घडली आहे त्यामुळे वन विभागाने पाहणी करून या भागात लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिक, शेतकर्यांकडून पुढे येत आहे.