

पारगाव : कांद्याचे घसरत चाललेले बाजारभाव आणि वातावरणातील बदलाचा फटका शेतकर्यांना बसत असतानाच परतीच्या पावसाने कांदा उत्पादकांची चिंता आणखी वाढवली आहे. बराकीत साठवलेले कांदे झपाट्याने सडू लागल्याने शेतकर्यांनी कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली आहे. बाजारभाव वाढीची आशा मात्र फोल ठरली आहे. (Pune Latest News)
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा काढणीच्या सुरुवातीला 10 किलोसाठी 200 रुपये दर मिळाला होता. मात्र, पिकावरील खर्च आणि गुंतवणूक लक्षात घेता बाजारभाव वाढेल या आशेने अनेक शेतकर्यांनी कांदा बराकीत साठवून ठेवला होता. पण सुरुवातीच्या मुसळधार पावसामुळे कांद्याची सड वाढली. सततचे ढगाळ वातावरण आणि मधूनच वाढणारी उष्णता यामुळे साठवलेल्या कांद्यांना कोंब फुटू लागले, काजळी आली आणि कांदा खराब होऊ लागला.
बाजारभाव वाढण्याऐवजी सतत घट होत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. सडलेला कांदा टाकण्यापेक्षा मिळेल त्या भावात विक्री करणे भाग पडले आहे. बराकीतून कांदे गोण्यांमध्ये भरून शेतकरी आजूबाजूच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागले आहेत. निम्म्याहून अधिक कांदे सडलेले असल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी अतुल इंदोरे (चांडोली खुर्द) यांनी सांगितले की, ‘दरवर्षी कांदा मोठ्या प्रमाणावर घेतो. बाजारभावात वाढ झाली की, विक्री करतो. पण यंदा भाव वाढण्याऐवजी सतत घसरत चालल्याने निराशा झाली आहे. दिवाळीनंतर भाव वाढतो म्हणून आम्ही कांदा साठवून ठेवला होता. परंतु, अतिपावसाचा फटका बसल्याने कांदे आताच सडू लागले आहेत. त्यामुळे नाईलाजाने मिळेल त्या भावात कांदा विक्री सुरू केली आहे.’
कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात सडू लागल्याने शेतकरी निराश झाले आहेत. सडलेला कांदा उकीरड्यावर फेकावा लागत असून, त्यासाठीही शेतकर्यांना खर्च करावा लागत आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
बाजारभाव वाढेल या आशेने शेतकर्यांनी कांदा साठवून ठेवला होता; मात्र अपेक्षाभंग झाला. उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला असून, त्यावर आधारित हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकर्यांची परवड होत आहे. खराब झालेला कांदा फेकून देण्याची वेळ आल्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले आहे.
बागायतपट्ट्यातील अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पुढील पिकासाठी भांडवल उभारणेही कठीण झाले आहे. दिवसेंदिवस संकट वाढत चालल्याने हमीभावाचा कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यासह कांदा उत्पादक शेतकर्यांनी केली आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
कांद्याचे भाव वाढतील, म्हणून अनेक शेतकर्यांनी साठा केला होता; पण कांदा चाळीत सडला. मोठ्या खर्चानंतरही काहीच फायदा होत नाही. हमीभावाशिवाय शेतकर्यांचा जीव वाचणे अवघड आहे, असे लांडेवाडीतील उद्योजक शाम गुंजाळ यांनी सांगितले.
सध्या बाजारात कांद्याची मागणी कमी आहे. शेतकरी अपेक्षेने माल रोखून ठेवतो; पण शेवटी सडल्यामुळे तोटा सोसावा लागतो. भाव स्थिर राहण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे मंचरचे कांदा व्यापारी वसंतराव व चंद्रकांत थोरात यांनी सांगितले.