पुणे

Pune Sport News : शालेय स्पर्धेत कराटे स्पर्धेची ’किक’ हुकणार

अमृता चौगुले

पुणे : स्वसंरक्षणाचा खेळ म्हणून नावारूपाला आलेल्या कराटे खेळावर सध्या संक्रांत आली आहे. या खेळाच्या दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा होण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (एमओए) च्या भूमिकेकडे क्रीडापटूंचे लक्ष लागले आहे. दरम्यान, क्रीडा विभागाच्या वतीने तूर्तास या स्पर्धा स्थगित केल्याने हजारो कराटेपटूंचे भविष्य टांगणीला लागले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या कराटेसारख्या खेळामध्ये सध्या दोन संघटना तयार झाल्याने खरी संघटना कोणती यावर चढाओढ लागलेली आहे.

आमचीच संघटना खरी असल्याचा दावा दोन्ही संघटनांनी केला असला तरी शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा आयोजनाचा तिढा मात्र सुटलेला नाही. दोन्ही संघटना स्वतःकडेच आयोजनाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी क्रीडा विभागाकडे करीत आहेत. दरम्यान, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दोन्ही संघटनांची एकत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार एकूण जिल्ह्यांचे वाटप करण्याचा प्रस्ताव दोन्ही संघटनांना दिला. परंतु, संघटनांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला.

सध्या सर्वच क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा सुरू असून, काही क्रीडा प्रकारांच्या विभागीय क्रीडा स्पर्धाही सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे कराटे क्रीडा प्रकाराच्या जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा कधी होणार आणि राज्यातील हजारो कराटेपटूंना न्याय मिळणार का, याकडे खेळाडूंचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे सचिव जॉर्जी इब्राहिम यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

इंडियन ऑलिम्पिक संघटनेची मान्यता असलेल्या राष्ट्रीय संघटनेशी आमच्या संघटनेची संलग्नता आहे. त्यामुळे अधिकृत संघटना आमचीच असून, त्यामध्ये प्रशिक्षक आणि पंचही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचेच आहेत. समोरच्या संघटनेकडे त्या दर्जाचे पंच नसल्याने स्पर्धा आयोजनावर आम्ही दावा सांगितला आहे. क्रीडा विभागाने या सर्व गोष्टींचा विचार करून आम्हाला स्पर्धा आयोजनाचा मान मिळावा.

– संदीप गाडे (सचिव, कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र)

शालेय कराटे स्पर्धा भरविण्याबाबत क्रीडा विभागाची आग्रही भूमिका आहे. क्रीडा विभागाकडे कराटे खेळातील पंच अथवा प्रशिक्षक उपलब्ध नसल्याने दोन्ही संघटनांची एकत्रित बैठक बोलवली होती. परंतु, या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे तूर्तास कराटेच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात याबाबत पुन्हा चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.

– सुधीर मोरे (सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT