Water Release Pudhari
पुणे

Janai Shirsai Water Release: ‘पाणी अर्ध्यावरच बंद’; खोरमधील शेतकऱ्यांचा जनाई-शिरसाई योजनेवर संताप

पद्मावती तलाव भरायच्या आधीच आवर्तन थांबले; अंजीर उत्पादकांनी सात दिवसांच्या वाढीव पाण्याची केली मागणी

पुढारी वृत्तसेवा

खोर: नुकतेच जनाई-शिरसाई योजनेतून खोर येथील पद्मावती तलावासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, हे आवर्तन अवघ्या तीन दिवसांतच बंद करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकला नाही. विशेषतः खोर ओढ्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनी नियमानुसार पैसे भरूनही त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचले नसल्याने तीव नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जनाई-शिरसाई योजनेतून उन्हाळी वाढीव आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी खोर (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पद्मावती तलावात पाणी पूर्णक्षमतेने पोहचण्यापूर्वीच आवर्तन बंद करण्यात आले. त्यामुळे तलावात अपेक्षित पाणीसाठा निर्माण झाला नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पाणी पोहचू शकले नाही. पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नसल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.

सध्या खोर परिसरात अंजीर पिकाच्या खट्टा बहार हंगामाची पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अंजीरबागांची चाळणी, छाटणी, बांधणी आणि इतर व्यवस्थापनाची कामे अंतिम टप्प्यात असून, या काळात पाण्याची गरज अत्यंत महत्त्वाची असते. वेळेवर आणि पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यासच आगामी हंगामात दर्जेदार आणि भरघोस उत्पादन मिळू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अंजीर हे खोर परिसरातील प्रमुख पीक असून, अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी या पिकावर अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या तीवतेमुळे भूजलपातळी घटली असून, विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. अशा परिस्थितीत जनाई-शिरसाई योजनेचे आवर्तन हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असतो. मात्र, या वेळी आवर्तन अपुरे राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आणि संबंधित विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन जनाई-शिरसाई योजना पुन्हा कार्यान्वित करावी व खोर गावासाठी किमान सात दिवसांचे वाढीव उन्हाळी आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.

शेतकऱ्यांची प्रमुख मागणी

  • जनाई-शिरसाई योजनेचे तातडीने पुनरावर्तन सोडावे.

  • खोर गावासाठी किमान सात दिवसांचे वाढीव आवर्तन द्यावे.

  • शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचेल याची खात्री करावी.

  • पद्मावती तलावात पुरेसा पाणीसाठा निर्माण करण्यासाठी योग्य नियोजन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT