खेड : पुनर्वसनामध्ये संपादित जमिनीबाबत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एका सेवारत सैनिकाचा महत्त्वाचा महसुली प्रश्न खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केवळ एका तासात मार्गी लावला. यामुळे संबंधित सैनिकास दिलासा मिळाला आहे.
विशाल मुळूक असे या सैनिकाचे नाव आहे. ते सेवारत सैनिक असून त्यांच्या जमिनीचा प्रश्न न्यायालयीन लढाईनंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे निकाली काढायचा होता. हा संघर्ष प्रदीर्घकाळ सुरू होता. त्याबाबत मुळूक यांनी आपली अडचण तहसीलदार बेडसे यांच्यासमोर मांडली. बेडसे यांनी मुळूक यांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले. त्यानंतर तहसीलदार बेडसे यांनी तत्काळ संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. कागदपत्रे तपासली आणि अवघ्या एका दिवसात हा प्रश्न मार्गी लावून संबंधित सैनिकाच्या नावावर जमिनीचा सातबारा तयार केला.
प्रशासकीय कामकाजात नागरिकांच्या, विशेषतः देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांच्या अडचणी त्वरित सोडवण्याबाबत दाखवलेल्या असामान्य तत्परतेबद्दल तहसीलदार बेडसे यांचे कौतुक होत आहे. या कामगिरीमुळे सैनिक मुळूक यांनी पत्र लिहून तहसीलदारांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. या तत्पर कार्याबद्दल, तालुक्यातील सैनिक संघटनेच्या वतीनेही तहसीलदार बेडसे यांचे आभार मानले आहेत.
खेडमध्ये रुजू झाल्यापासूनतहसीलदार प्रशांत बेडसे यांनी एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी आपला स्वतःचा मोबाईल नंबर बॅनर बनवून बाहेर लावला आहे. त्यावर त्यांनी स्पष्ट नमूद केले की, सैनिकांनी कोणत्याही प्रकारच्या अडचणीसाठी व्हॉट्सॲपद्वारे तत्काळ संपर्क साधावा. प्रशासनाकडून त्यांच्या अडचणीचे निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येईल.