खेड पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध जुगार-मटक्याचा अड्डा Pudhari
पुणे

Khed Illegal Gambling: खेड पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध जुगार-मटक्याचा अड्डा

या अड्ड्यांवर कार्यरत टोळ्या लोकांना आमिष दाखवून जाळ्यात ओढतात.

पुढारी वृत्तसेवा

खेड: राजगुरुनगर शहरातील जुन्या मोटार स्टँड व भाजी बाजार परिसरात खुलेआम जुगार-मटका सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विशेष म्हणजे, पोलिस मदत केंद्राजवळ व पोलिसांच्या उपस्थितीतच हा बेकायदा धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे.

या अड्ड्यांवर कार्यरत टोळ्या लोकांना आमिष दाखवून जाळ्यात ओढतात. खेळणार्‍यांचे पैसे संपेपर्यंत त्यांना जागा सोडू दिली जात नाही. त्यामुळे अनेक जण मानसिक तणावाखाली जात आहेत. काहीवेळा धमकावणे व मारहाणही केली जाते. पोलिसांच्या ’आशीर्वादाने’ हा धंदा फोफावल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. (Latest Pune News)

गुरुवारी (दि. 28) मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे राजगुरुनगरमार्गे मुंबईकडे जात असताना, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील गजबजलेल्या परिसरात मटका खेळला जात होता. हजारो कार्यकर्ते व पोलिसांच्या उपस्थितीतही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

विचारणा केल्यास पत्रकारांनाच ठणकावले

अवैध धंद्यांबाबत पोलिसांना विचारणा केली असता ’असे धंदे कुठे सुरू आहेत, सांगा’ असे पत्रकारांनाच उलट ठणकावले जाते. काही पत्रकारांना तर पोलिसच या धंदेवाल्यांकडून हप्ते मिळवून देत असल्याचा गंभीर आरोप आहे.

या सर्व प्रकारामुळे खेड तालुक्यात पोलिस आणि अवैध धंदे चालवणार्‍यांचे दृढ संबंध असल्याची चर्चा जोर धरत आहे. यामुळे नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होत असून, संताप वाढत आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करून राजगुरुनगर आणि खेड तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी तीव्र होत आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलिस काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांवर संगनमताचे आरोप

खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये अवैध दारू, गावठी दारू, मावा, गुटखा आणि गांजासारख्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. याविरोधात ग्रामपंचायती व नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या; मात्र तक्रारदारांची माहिती पोलिसांकडूनच संबंधितांना पुरवली जाते, असा गंभीर आरोप होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पानटपर्‍या, किराणा दुकाने व ठराविक अड्ड्यांवर हे पदार्थ सहज उपलब्ध आहेत. पोलिस मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT