इंदापूर: बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांचे कट्टर विरोधक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात, ‘हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर माझ्यामुळे एकत्र आले, त्यामुळे मला इथे नेहमी बोलवा म्हणजे तुम्ही दोघे एकत्र राहाल. मी दोघांच्या मध्ये बसतो. मला अडचण नाही. फक्त दोघांमध्ये मी चेपणार नाही एवढे बघा,’ असा मिश्किल टोला लगावताच हास्याचे फवारे उडाल्याचे चित्र पळसदेव (ता. इंदापूर) येथे दिसून आले.
पळसदेव येथील नितीन काळे यांच्या खासगी कार्यक्रमात हा राजकीय फड रंगला होता. या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, आमचे लोकप्रतिनिधी कृषिमंत्री झाल्यानंतर आमची ही पहिलीच भेट आहे. त्यांचे अभिनंदन करतो. ते कृषिमंत्री झाल्याचा आनंद आहे. ते स्वतः शेती करतात त्यांना विनंती आहे दुधाचे ,ऊसाचे आणि शेतीमालाचे दर पडले आहेत. (Latest Pune News)
ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्रात तीन तासांमध्ये एक शेतकरी आत्महत्या करत आहे, हे कसे बंद होईल यासाठी प्रयत्न करावा. हे एकट्याचे काम नसून, आमचाही काही प्रशासनातील अनुभव आहे. आम्हीही तुम्हाला मार्गदर्शन करू. आपण सर्वांनी मिळून लक्ष देणे गरजेचे आहे. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारचे कौतुक करत कट्टर राजकीय विरोधक असलेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शुभेच्छा दिल्या.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली. त्यांच्याकडे अनुभव आहे. माणसाकडे न्यूनगंड नसावा. मला माहीत पण नव्हतं मी कधी कृषिमंत्री होईल.
पद मिळत असतात, पण त्या पदाचा उपयोग जनतेसाठी झाला पाहिजे. पद मोठे आहे. जबाबदारीची जाणीव आहे. अडचणीत असलेल्या शेतकर्याला मदत कशी होईल, याची जाणीव आम्हाला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं लक्ष आमच्यावर असल्याने राज्यातील शेतकर्यांसाठी चांगले निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
शेतकरी बांधवांसाठी चांगल्या नवीन योजना आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. शिवेंद्रराजे भोसले आपण शेजारीशेजारी आहेत. मंत्री मंडळात ही आपण शेजारी आहोत. शेतीत अडचणी आहेत, चांगले नियोजन केले तर फायदा होतो शेतकर्यांनी टेन्शन घेऊ नका घेतले तर छातीत दुखते असा टोलाही त्यांनी लगावला.