दौंड: दौंड पोलिसांच्या नियोजनशून्य वाहतुकीच्या कारभारामुळे शहरात दररोज अगदी वर्दळीच्या वेळेस जड वाहने शहरात घुसत असून, यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. शहरात महत्त्वाच्या हुतात्मा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडीही यामुळे होत आहे. पोलिस मात्र सुस्त पडलेले दिसत आहेत.
पोलिस ठाण्याच्या समोर दररोज शाळा सुटायच्या वेळेस जड वाहने रस्त्याच्या मधोमध घातल्याने वाहतूक कोंडी होत आहे. धोकादायक वाहने ही शहरातील गजबळलेल्या ठिकाणी महत्त्वाच्या वेळेस आणू नये. त्यांना एखादी विशिष्ट वेळ ठरवून द्यावी. त्याच वेळेस त्यांनी ही मोठी वाहने शहरातील रस्त्यावरून घेऊन जावीत. (Latest Pune News)
दौंड शहरात बारामतीसारखी एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पोलिसांना सांगूनदेखील फक्त बघू करू, एवढेच आश्वासन मिळत आहे. शहरात सर्वच गोष्टींचा बोजवारा वाजलेला आहे. पोलिसांचे तर नागरिकांच्या हिताच्या एकाही गोष्टीकडे लक्ष नाही. यांचे लक्ष कशावर आहे. हे काय दौंडकरांना नव्याने सांगण्याची गरज नाही. वरिष्ठ अधिकारी शहरातील एवढे महत्त्वाचे प्रश्न सोडून अधिकार्यांचा कामकाजाचा आढावा कसा घेतात व अधिकारीदेखील थातुरमातुर कारवाई करून फार मोठी कारवाई केल्याचा गव-गवा करतात
दौंड हे अत्यंत संवेदनशील असून, अनेक घटना येथे घडत असतात. परंतु, पोलिस त्यांना अगदी हलक्यामध्ये घेतात. यवतसारखी घटना घडली, तर दौंड पोलिसांना आवरणे अवघड जाईल, हे मात्र निश्चित त्यात सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत. शहरात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. विशेषतः महिला वर्ग यांना मात्र शहरातील दुचाकीस्वारांचा त्रास होतो.
शहरात काहीजण पोलिस स्टेशन समोरच ट्रिपल सीट जात असतात. अवजड वाहने जात असतात. परंतु, पोलिसांना त्याचे काहीही घेणे देणे नाही वरिष्ठ अधिकारी तर दौंडच्या बाबतीत अगदी सुस्त पडलेले दिसत आहेत. पोलिसांना काही पुरावे देऊनदेखील त्यांनी कारवाईदेखील केलेली नाही. याबाबत पोलिस अधीक्षक गप्प का? याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.