खेड: खेड तालुक्यातील निमगाव (खंडोबा) येथून एका गुन्ह्यात फिर्यादी असलेली 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुलीला कोणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेपत्ता मुलगी पल्लवी अशोक जाधव (वय 17, मूळ रा. पिराची ठाकरवाडी चास, ता. आंबेगाव, सध्या रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) ही दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र, ती आढळून आली नाही.
पल्लवी ही रंगाने गोरी, उंची सुमारे 4 फूट, अंगाने सडपातळ आहे. बेपत्ता होताना तिने निळ्या-पांढऱ्या रंगाचा चुडीदार आणि पायात चॉकलेटी रंगाची चप्पल घातली होती. तिचे केस लांब असून उजव्या कानाजवळ मोठा मस (तीळ) आहे. ती मराठी भाषा बोलते.
खेड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल राजे यांनी सांगितले की, मुलीच्या बेपत्ता होण्यामागे कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा प्राथमिक संशय आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
पल्लवी हिच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ती कुठे दिसल्यास त्वरित खेड पोलिस ठाण्याशी (फोन क्रमांक: 02135-222233) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक स्नेहल राजे यांनी केले आहे.