पुणे: राज्यात खरीप हंगामात सद्य:स्थितीत 104.26 लाख हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 72 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. भात पिकाची रोपे लागवडीयोग्य झालेली असल्याने काही ठिकाणी भाताच्या पुनर्लागवडीस सुरुवात झालेली आहे. शेतकर्यांकडून मका लागवडीस प्राधान्य दिले जात असून सद्य:स्थितीत 117 टक्के क्षेत्रावरील मक्याच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
राज्याचे खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र 144 लाख 36 हजार 54 हेक्टरइतके आहे. खरिपाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भात रोपवाटिका टाकलेल्या आहेत, अशा ठिकाणच्या भात लागवडीस पुनर्लागवडी सुरू झाल्या आहेत. (Latest Pune News)
विशेषतः कोकणातील जिल्ह्यात भात लागवडीस पोषक स्थिती आहे. तूर पिकाखालील क्षेत्र 12.77 लाख हेक्टर असून 9.61 लाख हेक्टरवर (75 टक्के), मुगाच्या तीन लाख हेक्टरपैकी 1.75 लाख हेक्टरवर (58 टक्के), उडदाचे 3.59 लाख हेक्टरपैकी 2.96 लाख हेक्टरवर (82 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक 47.21 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 39.51 लाख हेक्टरवर (84 टक्के) तर भुईमूगाचे 1.66 लाख हेक्टरपैकी 85 हजार हेक्टरवर (51 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. कापूस पिकाखाली 42.47 लाख हेक्टरइतके सरासरी क्षेत्र असून 32.93 लाख हेक्टरवर (78 टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे.
जनावरांचा चारा, पोल्ट्री, इथेनॉलमुळे मका क्षेत्रात वाढ
राज्यात आत्तापर्यंत मक्याची शंभर टक्क्यांहून अधिक पेरणी पूर्ण झालेली आहे. मका पिकाचे सरासरी क्षेत्र हे 9.33 लाख हेक्टरइतके आहे. त्यापेक्षा अधिक म्हणजे 10.94 लाख हेक्टरवर मका पेरणी पूर्ण झालेली आहे. कारण जनावरांच्या चार्यासाठी मक्याची गरज असल्याने शेतकरी प्रथम प्राधान्य बाजरी व खरीप ज्वारीऐवजी मका पिकाला देऊ लागले आहेत.
शिवाय पोल्ट्री उद्योजकांकडूनही असलेली हमखास मागणी यामुळेही अन्य पिकांऐवजी मक्याच्या अधिक लागवडीकडे शेतकर्यांचा कल वाढत चालला आहे. केंद्राने धान्यापासून इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन दिले आहे. त्यामध्ये मक्याचा समावेश असून कंपन्यांकडून मक्याला मागणी वाढत असल्याने क्षेत्रवाढ होत असल्याची माहितीही कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.
नागपूर विभागात मागील सप्ताहात पुरेसा पाऊस झाल्यामुळे या विभागात लांबलेल्या खरिपातील पेरण्यांना आता वेग येण्याची अपेक्षा आहे. खरिपातील पेरण्यांचा कालावधी आणखी 15 दिवस राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, भाताच्या पुनर्लागवडी यापुढे वाढतील. त्यामुळे एकूण खरीप पिकांच्या पेरण्यांखालील टक्का निश्चित वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या खरिपातील उगवण झालेल्या पिकांची वाढ समाधानकारक आहे.- वैभव तांबे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे.