पुणे

वडगाव मावळ : कृषी विभागाची खरीप हंगाम तयारी जोरात

अमृता चौगुले

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पवनमावळ भागात शिळिंब येथे आत्मा योजनेअंतर्गत सगुणा राईस तंत्र (एसआरटी)भात लागवड प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणास शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ व प्रकल्प संचालक विजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सगुणा राइस तंत्र (एसआरटी)भात लागवड प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोराडे यांनी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी नागनाथ शिंदे यांनी कृषी विभागाकडून केले जाणारे खरीप हंगाम नियोजन व योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. आत्मा योजनेचे राहुल घोगरे यांनी आत्मा योजनेअंतर्गत राबविण्यात येणार्‍या योजनांची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, माजी सभापती नंदू धनवे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष कडू आदी उपस्थित होते. या वर्षी शिळिंब, तुंग, चावसर, मोरवे, आजीवली या गावात मोठ्या प्रमाणात एस.आर.टी. लागवड करण्याचे नियोजन केले असल्याचे कृषिसहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले .

पवनमावळात पोषक वातावरण

चांगला पाऊस पडतो, त्यामुळे शेतकर्‍यांनी एसआरटी पद्धतीने लागवड केल्याने या पद्धतीमध्ये उत्पादन जास्त मिळत असल्याचे व आवणी /लावणीचे कष्ट वाचल्यामुळे निम्मा त्रास कमी होतो, कोळपणी करण्याची गरज नाही, रासायनिक खतांच्या गरजेचे प्रमाण निम्म्यावर येते, या पद्धतीमध्ये अगोदरच्या पिकाची मुळे वाफ्यामध्येच ठेवल्यामुळे मुळांची जाळी तयार होते व त्यामुळे पावसाचा ताण पडला तरी पारंपरिक पद्धतीमध्ये चिखलणी केलेल्या जमिनीप्रमाणे भेगाळत नाही;

तसेच ही अगोदरची मुळे पुढील पिकाच्या सेंद्रिय कर्बाची गरज भागवितात व माती मऊ होते, ह्या नावीन्यपूर्ण पद्धतीमुळे भाताच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, लहू धनवे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रचे राहुल जगताप यांनी केले.

सगुणा राईस तंत्र (एस.आर.टी.) हे भातशेती संबंधित उखळणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यावर बी टोकनी करून उत्तम भात पिकविण्याचे तंत्र आहे. या पद्धतीत वापरलेल्या गादी वाफ्यामुळे भात रोपांच्या मुळाशी सुयोग्य प्रमाण, तसेच पुरेसा ओलावा राहतो. साच्यामुळे दोन रोपातील नेमके व सुयोग्य अंतर व प्रति एकर रोपाची संख्या नियंत्रित करता येऊ शकते. या पद्धतीमध्ये मजूर कमी लागतात, नांगरणी, चिखलणी व लावणी न करायला लागल्यामुळे 50 ते 60 टक्के खर्च कमी होतो व आर्थिक बचत होते.

– विकास गोसावी, कृषी सहाय्यक शिळिंब

कृषी विभागामार्फत कायमच शेतकर्‍यांसाठी शिळिंब येथे प्रशिक्षण, मेळावे कार्यक्रम घेतले जातात. याचा आम्हा शेतकर्‍यांना फायदा होतो. शिळिंब गावचे कृषी अधिकारी विकास गोसावी हे गेली चार वर्षे शेतकर्‍यांसाठी अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत.

-संभाजीराव शिंदे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ

हेही वाचा

SCROLL FOR NEXT