बारामती : सोहळ्यात महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी वेगळे पथक ; विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती | पुढारी

बारामती : सोहळ्यात महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी वेगळे पथक ; विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात विशेष खबरदारी म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ड्रोनचा वापर होत आहे. साध्या वेशात पोलिस तैनात आहेत. महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे पथक कार्यान्वित आहेत. गुन्हे घडणार नाहीत, याची पूर्णतः खबरदारी घेतली जात असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (दि. 18) बारामतीत मुक्कामी येत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी शुक्रवारी (दि. 16) यवत ते बारामती पालखी मार्गाचा प्रवास केला. तसेच सायंकाळी बारामती येथील पालखी सोहळ्याचे मुक्कामस्थळ असलेल्या शारदा प्रांगणाची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते.

अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, बारामती शहरचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, नगरपरिषद अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनील धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते. विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी सोहळा मुक्कामाची तसेच वारकर्‍यांच्या सुविधांची माहिती घेतली. पोलिस प्रशासनाच्या वतीने वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पालखी सोहळ्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. मुंबईसह अन्य ठिकाणचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. विविध पथके कार्यरत आहेत. हजारोंच्या संख्येत पोलिस मनुष्यबळ उपलब्ध आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. बारामतीकरांनीही वारकर्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन फुलारी यांनी या वेळी केले.

Back to top button