पुणे: खडकवासला धरणसाखळीतील पाणीवाटपाच्या नियोजनाचा वाद पेटला असून, आता हा वाद थेट मंत्रालयस्तरावर पोहोचला आहे. याबाबत बारामती आणि इंदापूर तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी पाण्यासाठी वेगवेगळी मागणी करून पाणी वळविल्याचे परस्पर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. याचा थेट परिणाम पाणी वाटपावर आणि पुढील पाण्याच्या नियोजनावर होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे याचा तोडगा आता मंत्रालयीन स्तरावरच काढला जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांमधून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील सिंचनक्षेत्रासाठी पाणी आरक्षित आहे.
त्यानुसार सुमारे 22.50 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाटपाचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तयार करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) लोकसंख्येनुसार पाणीवाटपाचे मापदंड निश्चित करून दिले असताना पुणे महानगरपालिका 18 ते 20 टीएमसी पाणी घेत आहे. त्यातच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी जनाई-शिरसाई योजनेतून मुठा कालव्याद्वारे 11 गावांसाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, याचा धरणसाठ्यातील पाणी वितरणावर परिणाम होत असून, याला राजकीय रंग लागल्याचा आरोप बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जलसंपदा विभागाने पाणी वाटपाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याचे आश्वासन, चालढकल केल्याने नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार किंवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मंत्रालयीन स्तरावर पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्की वाद कशामुळे?
जनाई-शिरसाई योजनेच्या उन्हाळी आवर्तन अर्ध्यातच बंद केल्यानंतर स्थानिक आमदार रोहित पवार यांनी संतप्त शेतकऱ्यांना घेऊन थेट सिंचन भवनात तळ ठोकला आणि या वेळी त्यांनी इंदापूर तालुक्यात सत्ताधारी तसेच मंत्री असल्याचा आरोप करत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावून पाणी सुरू करण्याची मागणी केली. दौंड आणि इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी पळविण्याचा कोणाला अधिकार नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच, अधिकारी दबावानुसार काम करत असल्याचा आरोप केल्याने बारामती, इंदापूर तालुक्यांमध्ये वाट पेटला.