खडकवासला : खानापूरमध्ये खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सरकारी मालकीच्या पडीक जमिनीवर ग्रीन थंब संस्थेच्या पुढाकाराने व लोकसहभागातून देशातील पहिले वटवृक्ष पार्क उभारले आहे. अवघ्या आठ-नऊ महिन्यांत पार्कमधील साठ -सत्तर वटवृक्ष बहरले आहेत. वीस ते पंचवीस फूट उंचीपर्यंत वृक्षांची वाढ झाली असून, या ठिकाणी चिमणी, कावळा, कोकीळ आदी पक्ष्यांचे वास्तव्य वाढले आहे.
वृक्षांचा राजा म्हणून वटवृक्षाची ओळख आहे. भारतीय संस्कृतीत तसेच आयुर्वेदात प्राचीन काळापासून वटवृक्षाला महत्त्व आहे. सर्वांत गंभीर ऑक्सिजन देणारे तसेच धार्मिक महत्त्व आणि विविध रोगांवर गुणकारी असलेल्या बहुपयोगी वटवृक्षांनी धरणतीरावरील परिसर हिरवाईने नटला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून खडकवासला धरणातील गाळ काढून काढलेल्या गाळ मातीचा पडीक, दलदलीच्या जमीनवर भराव टाकून ग्रीन थंब संस्थेच्या पुढाकाराने लोकसहभागातून तब्बल पाचशेहून अधिक एकर क्षेत्रात भरीव वृक्षलागवड केली आहे. बांबू पार्क, वन जंगल, देवराई, पशु पक्षी निवारा केंद्र, पदपथ, विविध गार्डन, स्थानिक नागरिकांसाठी दशक्रिया विधी घाट, शेत रस्ते, फळबागा आदी उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे खडकवासला धरण माथ्यापासुन गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, खानापूर,सोनापुर, कुरण बुद्रुक, जांभली आदी ठिकाणी विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा अप्रतिम नजाराणा पाहावयास मिळत आहे.
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन औषधी वनस्पती, दुर्मिळ वृक्षांसह देशी जातीच्या वृक्षांची लागवड केली आहे. बांबूसह वीस ते पंचवीस लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. त्यात आता देशातील पहिल्या वटवृक्ष पार्क (वटवन)ची भर पडली आहे. लोकसहभागातून संस्थेने जवळपास पाचशे एकर नवीन जमीन तयार केली आहे. याची सर्व मालकी शासनाची आहे. तसेच खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक येथे पडीक जमिनीवर बहरलेले पाच वनीकरण प्रकल्प, गार्डन ,पक्षी निवारा केंद्र आदीश प्रकल्प खडकवासला जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित केले आहेत.सुरेश पाटील, कर्नल, अध्यक्ष, ग्रीन थंब संस्था
वटवृक्षाला कमी पाणी लागते. पक्षांचे वास्तव्य या वृक्षावर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अनेक जातींच्या पक्षांचे संवर्धन या वृक्षामुळे होते तसेच या वृक्षांच्या बिया पक्षी खात असल्याने त्यांच्या विष्ठेतून या वृक्षांचे संवर्धन होत आहे.स्मिता अर्जुने, वन परिमंडळ अधिकारी व वनस्पती अभ्यासक, पानशेत वन विभाग