खडकवासला: सिंहगड भागातील खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सोमवारी (दि. 27) सकाळी आरोग्य केंद्रात फक्त दोनच कर्मचारी हजर होते. डॉक्टर, नर्स, औषध विभागातील इतर कर्मचारी गैरहजर होते.
या आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी सकाळच्या सुमारास वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्णांना ताटकळत त्यांची वाट पाहावी लागत आहे. आरोग्य केंद्रात सोमवारी सकाळी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते तसेच नर्स, औषध विभागातील कर्मचारीही अनुपस्थित होते.
रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णालयात वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यामुळे बेजबाबदार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षाराणी मुंडासे यांच्याशी संपर्क साधला असता, मी रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांना वेळेवर हजर राहण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल मागविण्यात येणार आहे. त्यानंतर जे अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर हजर नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.महेश वाघमारे, विस्तार अधिकारी, हवेली पंचायत समिती