खडकवासला: खडकवासला धरणतीरावरील खानापूरमध्ये धरणातून काढलेला गाळ पडीक जमिनीवर टाकून तेथे ग््राीन थंब संस्थेच्या पुढाकाराने व फिनोलॅक्स पाईप कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने दहा हजार वृक्षांचा हरित पार्क उभारला आहे. तसेच, दोन किलोमीटर अंतराचा शेत रस्ताही तयार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती मालासह दूधवाहतुकीची सोय झाली आहे.
ग््राीन थंब संस्थेच्या पुढाकाराने लोकसहभागातून गेल्या पंधरा वर्षांपासून खडकवासलातील गाळ काढण्यात येत आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढली आहे. शेतकऱ्यांना मोफत गाळ व फळझाडे देण्यात येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीत भर पडत आहे. फिनोलॅक्स पाईप कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने खानापूरमधील धरणतीरावर दोन किलोमीटर अंतराचा रस्ता तयार करून दोन्ही बाजूंना सुपारी, नारळ आदी वृक्षांची लागवड केली आहे.
तसेच, हरित पार्कमध्ये दहा हजार आंबा, काजू, फणस, सिल्व्हर ओक, सुरू आदी वृक्षांची लागवड केली आहे. तसेच लोकसहभागातून धरणतीरावर मत्स्य उत्पादन तळी, पक्षी आयलंड तयार केली आहेत. फिनोलॅक्स कंपनीचे अधिकारी जितेंद्र जाधव व सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते सोमवारी (दि.2) हरित पार्कमध्ये वृक्षलागवड करण्यात आली.
यावेळी ग््राीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती दिली. कर्नल पाटील म्हणाले, धरणातील काढलेला गाळ तीरावर पडीक, दलदलीच्या ठिकाणी टाकून पाचशेहून अधिक एकर जमीन तयार केली आहे.
या जमिनीवर विविध जातींच्या वीस लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. धरणाच्या दोन्ही तीरांवर स्थानिक भूमिपुत्रांसाठी वीस किलोमीटर अंतराचे शेत रस्ते तयार केले आहेत. ओसाड जागेवर फळबागा, वनराई बहरली आहे. धरणाच्या परिसरात गर्द झाडी जंगल, देवराई वनराई फुलली आहे.