पुणे: जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पाणीगळती आणि बाष्पीभवन कमी करणार्या खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. खडकवासला, धायरी, कात्रज, वडाचीवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी आणि लोणी काळभोर या सात ठिकाणांहून एकाच वेळी खोदाई केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
खडकवासला धरणातील पाणी सध्या खुल्या कालव्याद्वारे पुढे नेले जाते. त्यामुळे पाणीगळती, बाष्पीभवन आणि प्रदूषण होते. बोगदा पूर्ण झाल्यानंतर या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत. परिणामी, सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. बचत होणार्या पाण्यातून अतिरिक्त 3 हजार ४७२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
खडकवासला धरणातील पाणी फुरसुंगीपर्यंत बंदिस्त बोगद्यातून नेण्यासाठी जलसंपदा विभागाने २३ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाला ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरुवात करण्यात आली. सध्या चार बूमर मशिनच्या साहाय्याने सात ठिकाणांहून बोगद्याची खोदाई सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे पाच किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
प्रत्यक्ष कामाला वर्षभरापूर्वी सुरुवात
प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन एक वर्ष लोटले आहे. खडकवासला, धायरी, कात्रज, वडाचीवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी आणि लोणी काळभोर अशा सात ठिकाणांहून एकाच वेळी बोगदा खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
गुरुत्वाकर्षणाने पोहचणार पाणी
धरणाच्या भिंतीपासून मागील बाजूस ९० मीटर अंतरावर आणि जलाशयाच्या पातळीखाली १८ मीटर खोलीवरून हा बोगदा जाणार आहे. खडकवासला धरणातील पाणी कोणत्याही उपशाशिवाय गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने फुरसुंगीपर्यंत पोहचविले जाणार आहे.
...असा आहे प्रकल्प
बोगद्याची लांबी : २३ किलोमीटर
बोगद्याचा व्यास : ६.३ मीटर
बोगद्याचा आकार : 'डी' आकार
पाणी वाहून नेण्याची क्षमता : प्रतिसेकंद ४१ घनमीटर
खोदाईसाठी यंत्रे : चार बूमर मशिन
अपेक्षित पाणीबचत : सुमारे अडीच टीएमसी
अतिरिक्त सिंचन क्षेत्र : ३ हजार ४७२ हेक्टर