खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे सुस्थितीत; जिल्हा निवडणूक आयोगाकडून पडताळणी पूर्ण Pudhari
पुणे

Khadakwasla EVM: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे सुस्थितीत; जिल्हा निवडणूक आयोगाकडून पडताळणी पूर्ण

या वेळी यंत्रे सुस्थितीत कार्यरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे उमेदवार सचिन दोडके यांनी जिल्हा निवडणूक आयोगाकडे मतदान यंत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.25) मतदान यंत्रांची पडताळणी करण्यात आली. या वेळी यंत्रे सुस्थितीत कार्यरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांतील मतमोजणीत अनियमितता झाल्याच्या कारणास्तव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) अनुक्रमे प्रशांत जगताप आणि सचिन दोडके यांनी जिल्हा निवडणूक शाखेकडे यंत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केले होते. त्यासाठी आवश्यक शुल्कही भरले होते. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने खडकवासला मतदारसंघातील यंत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. (Latest Pune News)

या अनुषंगाने जिल्हा निवडणूक शाखेकडून शुक्रवारी (दि. 25) दोडके यांनी नमूद केलेल्या दोन कंट्रोल युनिट्सची भोसरीतील निवडणूक शाखेच्या गोदामात पडताळणी करण्यात आली. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी हे दोन्ही यंत्रे नीट कार्यरत असल्याचे दाखविले.

आयोगाच्या नियमानुसार 1400 मतांचे प्रतिरूप मतदान (मॉकपोल) करणे अपेक्षित होते. मात्र, दोडके यांनी त्याची आवश्यकता नसल्याचे सांगितल्याने मॉकपोल करण्यात आले नाही. त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी चर्चा करून केवळ यंत्रांची पडताळणी करण्यात आली आणि दोडके यांचा अर्ज निकाली काढण्यात आला. दरम्यान, हडपसर मतदारसंघातील पडताळणीबाबतचा निर्णय उच्च न्यायालयातील याचिकेवरील निकालानंतर घेतला जाणार आहे.

मॉकपोलची गरज नाही

मतदान यंत्रांच्या तपासणीनंतर प्रतिरूप मतदान (मॉकपोल) घेण्यात येणार होते. त्यानंतर 1400 मतदानांची प्रक्रिया होणार होती. मात्र, सचिन दोडके यांनी मॉकपोल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने मॉकपोल घेण्यात आला नाही.

खडकवासला मतदारसंघाच्या फेरपडताळणीबाबत कोणतीही याचिका सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार संबंधित मतदान यंत्रांतील डेटा लवकरच नष्ट केला जाईल. उमेदवाराने मॉकपोलला नकार दिल्याने तो घेण्यात आलेला नाही. उमेदवार नकार देत असल्यास मॉकपोल घेणे बंधनकारक नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. अर्ज निकाली काढण्यात आला असून, सध्या मतांचा डेटा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. आयोगाच्या पुढील आदेशानंतरच तो नष्ट केला जाईल.
- मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT