Illegal plotting on Pune hills
दिगंबर दराडे
पुणे: पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, जांभूळवाडी डोंगर भागातील परिसरात अनधिकृत प्लॉटिंग करून ते विकणे तसेच या भागात अवैध उत्खनन जोरदारपणे सुरू आहे. भरदिवसा रोजरोसपणे बेकायदा प्लॉटिंग करून ‘मालामाल’ होत असलेल्या बिल्डरांच्या दावणीला प्रशासनाला बांधले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे. बनावट सातबार्याचा वापर करीत डोंगर गिळकृंत करण्याचा तडाखाच माफियांनी लावल्याचे चित्र दिसत आहे.
मालक कोण, प्लॉट कोणाचा, हा प्रश्न आता प्रशासनालादेखील पडला आहे. डोंगराचा पायथाच काय; पण डोंगरमाथाही गिळत पर्यावरणाचा र्हास करणार्या दलालांना आळा घालण्यास कोणीच पुढे येताना दिसत नाही. (Latest Pune News)
त्यामुळे पुणे शहराच्या सीमेलगतच्या डोंगर-पायथ्यालगत तसेच उतारावरही बेकायदा प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांनी अक्षरशः डोंगरांना पूर्णत: वेढले आहे. वनजमिनीपासून ते बांधकाम निषिद्ध झोनपर्यंत असंख्य ठिकाणी बिनधास्तपणे रस्ते फोडले जात आहेत, विद्युत खांब टाकले जात आहेत आणि प्लॉट विक्रीचे फलक झळकवले जात आहेत. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व पुणे महानगरपालिका मात्र शांतपणेबघ्याची भूमिका घेत आहे.
पुणे शहराच्या चारही दिशांना विस्तार होत असतानाच डोंगराळ परिसरात अनधिकृत बांधकाम आणि बेकायदा प्लॉटिंगचा स्फोट होताना दिसत आहे. बाणेर, सुस, सिंहगड रस्ता, कोथरूड, कात्रज, आंबेगाव, लोणी काळभोर, येरवडा, पाषाण या भागांतील डोंगर उतारांवर हजारो चौरस फुटांच्या प्लॉट्सचे विभाजन करून विक्रीसाठी खुलेआम जाहिराती केल्या जात आहेत. या सगळ्या प्रक्रियेतील धक्कादायक बाब म्हणजे, वनविभाग आणि महसूल खाते हे तिन्हीही विभागाकडे डोळेझाक करत आहेत.
रस्ता फोड, झाडतोड, वीज जोडणी - सगळं अनधिकृतपणे सुरू आहे. अनेक ठिकाणी वनजमिनीवर जेसीबी घालून रस्ते तयार केले जात आहेत. रस्ता झाल्यावर झाडं कापून प्लॉट्सचे मोजमाप सुरू होतं. विजेचे खांबही लावले जात असून, काही ठिकाणी थेट खाजगी विहिरींवर मोटर लावून पाण्याचा वापरही सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकाला एक जिना बांधताना प्रशासनाकडे दहा चक्कर मारावे लागतात, आणि इकडे डोंगरात जेसीबी सुरू आहे - हीच खरी शहरी दुटप्पी व्यवस्था! अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिक देत आहेत.
डोंगरांवर प्लॉटिंग करणारे काही भूमाफिया बनावट 7/12 उतारे, खंडण केलेले दस्तऐवज, आणि घरकुल योजनांच्या नावाखाली खरेदी करार करून लोकांना आकर्षित करत आहेत. ग्राहकांना हे जमीनदारांच्या नावावर असून, तुमचं नाव लवकरच टाकून घेऊ, असे सांगून पैसे घेतले जात आहेत.
महत्वाचे मुद्दे -
तपासणीच्या नावाखाली ’मालामाल’
पर्यावरणाची हत्या, प्लॉटिंग जोरदार
सामान्यांची फसवणूक
सरकारी यंत्रणा निष्क्रिय
माफियांना संरक्षण?
मी जांभूळवाडी येथील स्थानिक रहिवाशी असून, कोळेवाडी बोगद्याचा काढलेला गौण खनिज कसल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता बेकायदा वापरून तयार केलेली धोकादायक गॅबिंग वॉल पडलेली आहे. त्यामुळे आमच्या शेतीला व शेतीसाठी पूरक असलेल्या विहिरीला जांभूळवाडी गावाला मोठ्या धोका निर्माण झालेला आहे. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळे दोन मुले वाहून गेली होती. पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये व जांभूळवाडी येथे माळीनसारखा प्रश्न निर्माण होऊ नये. गावाचे ओढे-नाले पूर्ण मुरमाने भरून गेले असून, अतिवृष्टी झाल्यास जांभूळवाडी गावाला जोडणारा रस्ता जांभूळवाडी तलाव या सर्वांना धोकादायक होऊ शकते, अशा परिस्थितीमध्ये हे काम केलेलं आहे त्यामुळे गावाचे व येणारे-जाणारे शाळेतील मुले, वयोवृद्ध माणसे या सर्वांना धोका निर्माण झालेला आहे.
- स्थानिक नागरिक, जांभूळवाडी
अनधिकृत बांधकामांमुळे पुण्याच्या डोंगररांगांचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाचा मोठा र्हास होत आहे. डोंगर उतारावरील पावसाचे पाणी मुरण्याऐवजी वाहून जाते. झाडतोड झाल्यामुळे मृदगाळण वाढतो. टेकड्या निसर्गाचे सौंदर्य आहे. यामुळे हवामान खराब होत आहे. झाडी वाढते ती पक्ष्यांमुळे. पक्ष्यांच्या विष्ठेतून जीवसृष्टीची मोठ्या प्रमाणात वाढ होते. डोंगरफोडीमुळे प्रामुख्याने या ठिकाणी पक्षी दुर्मीळ होत आहेत.
- राजेंद्र शेंडे, पर्यावरणतज्ज्ञ