वेल्हे: पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांची तसेच 66 हजार हेक्टर शेतीची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत गतवर्षापेक्षा अधिक साठा आहे. धरणसाखळीत शनिवारी (दि. 27) दिवसअखेर 23.96 टीएमसी म्हणजे 82.17 टक्के साठा आहे.
सध्या खडकवासलातून हवेली, दौंड, इंदापूरसह जिल्ह्यातील शेतीला रब्बी आवर्तनाचे पाणी सोडले जात आहे. हे आवर्तन 1 फेबुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
खडकवासला धरण विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 9 डिसेंबर रोजी शेतीला रब्बी आवर्तनाचे पाणी सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून शुक्रवारपर्यंत (दि. 26) 1.39 टीएमसी पाणी शेतीला सोडले आहे. सध्या खडकवासलातून मुठा कालव्यात 1 हजार 54 क्सुसेक वेगाने शेतीसाठी पाणी सोडले जात आहे.
यंदा एक टीएमसी अधिक पाणी
गेल्या वर्षी आजच्या दिवशी 27 डिसेंबर 2024 रोजी खडकवासला धरणसाखळीत 23 टीएमसी म्हणजे 78.90 टक्के साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत जवळपास एक टीएमसी अधिक पाणी आहे. सध्या पानशेत 84.33, वरसगाव 85.86, तर टेमघरमध्ये 80.03 टक्के साठा आहे. शेती व पिण्यासाठी पूर्णक्षमतेने पाणी सोडले जात असल्याने तिन्ही धरणांतील पाणीपातळी खाली जात आहे.
शेतीला पाण्यासह पुणे शहर व परिसरासाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासला धरणात वरील तिन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत व वरसगावमधून प्रत्येकी 600 व टेमघर 300 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. खडकवासलाची पाणीपातळी 50 टक्क्यांवर कायम असल्याने शेती व पिण्यासाठी नियोजनबद्ध पाणीपुरवठा होत आहे.गिरिजा कल्याणकर-फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण विभाग