Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीत विसर्ग; चारही धरणे १०० टक्के भरली

पानशेत, खडकवासला धरणक्षेत्रात गतवर्षापेक्षा अधिक पाऊस; सोमवारी सायंकाळी ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: जून महिना कोरडा गेला, तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धरणक्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पानशेत आणि खडकवासला येथे गतवर्षापेक्षा अधिक, तर वरसगाव आणि टेमघरमध्ये जवळपास गतवर्षाइतका पाऊस पडला आहे.

दरम्यान, पावसाचा जोर ओसरला असला तरी तुरळक पाऊस पडत असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोमवारी (दि. १०) सायंकाळी पाच वाजता ८५६ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला.

यंदा १ जूनपासून १० ऑगस्टपर्यंत खडकवासला येथे ७०८, वरसगाव येथे १९२७, पानशेत येथे २०४५ व टेमघर येथे २८१८ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी याच कालावधीत पानशेत येथे १९१८, खडकवासला येथे ६९०, टेमघर येथे २९८१ व वरसगाव येथे १९४९ मिलिमीटर पाऊस पडला होता. रविवारी (दि.९) सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे.

रविवारी रात्री आठ वाजता खडकवासलातून मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला. सोमवारी सकाळपासून तुरळक पाऊस पडला. त्यामुळे सायंकाळी खडकवासलातून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला. याशिवाय पिण्यासाठी बंद जलवाहिनी व मुठा कालव्यात पाणी सोडले जात असले, तरी खडकवासलासह चारही धरणे शंभर टक्के भरून वाहत आहेत.

सोमवारी दिवसभरात टेमघर येथे १४, खडकवासलात ५ व वरसगावला १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वरील तिन्ही धरणांतून एकूण २ हजार ४२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. याची भर खडकवासलात पडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT