खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता
29.15 टीएमसी
खडकवासला : गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणसाठ्यातील वाढ मंदावली आहे. गेल्या 24 तासांत खडकवासला धरणसाखळीत फक्त 0.29 टीएमसीची वाढ झाली.
बुधवारी (दि. 9) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 19.94 टीएमसी म्हणजे 68.39 टक्के साठा झाला होता. काल मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 19.65 टीएमसी पाणी होते. गेल्या आठवड्यात पडलेल्या संततधार पावसामुळे साखळीत जवळपास सहा टीएमसीची वाढ झाली. सोमवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. उघडिपीनंतर ऊन पडत आहे. तुरळक पाऊस पडत आहे.
टेकपोळे, दापसरे, तव, आडमाळच्या डोंगरी पट्ट्यात मात्र रिमझिम सुरू आहे. सकाळी सिंहगड भागात रिमझिमीनंतर पावसाने उघडीप घेतली. असे असले तरी पानशेत-वरसगाव खोर्यात पावसाळी वातावरण कायम असून, डोंगरी पट्ट्यात सायंकाळी पाचनंतर अधूनमधून हलक्या सरीसुरू झाल्या.
ओढ्या-नाल्यांतील पाण्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे काल खडकवासलाचा विसर्ग 1 हजार 655 क्युसेकपर्यंत कमी केला आहे. पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासलातील पाणीपातळी 56 टक्क्यांवर खाली आली आहे.
खडकवासला धरण विभागाच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर म्हणाल्या की, धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. जादा पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. तसेच पिण्यासाठी पाणी सोडल्याने धरणातील पाण्याची पातळी खाली गेली आहे.
आज दिवसभरात टेमघरमध्ये 3, वरसगावमध्ये 3, पानशेतमध्ये 2 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासलात पावसाची नोंद झाली नाही. धरणसाखळीत सर्वांत मोठ्या वरसगाव धरणात सर्वांत अधिक 72.85 टक्के साठा झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास वरसगावसह पानशेत धरण आठ-दहा दिवसांत शंभर टक्के भरल्याचे खडकवासला जलसंपदा विभागाने सांगितले.