

MIDC Waluj crime hotspot 16 murders in six months
प्रमोद अडसळे
छत्रपती संभाजीनगर : शहरात क्षुल्लक कारणावरून हत्यार उपसले जात आहेत. गेल्या सहा महिन्यांत तब्बल १६ खून तर ७१ जणांवर जीवघेणे हल्ले झाले. दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, ८४ घरफोडीच्या घटना घडल्यानंतरही पोलिसांना केवळ ७ घरफोडीचा उलगडा करण्यात यश आले. ८०९ चोरीच्या घटनांपैकी १७२ गुन्हे उघडकीस आले. तर १० दरोड्याच्या घटनाही घडल्या आहेत. बजाजनगर दरोड्यातील साडेपाच किलो सोनेही अद्याप सापडलेले नाही. नागरिकांनी कष्टाने कमावलेला लाखोंच्या सोने-चांदीसह रोख रकमेवर डल्ला मारलेल्या चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना सपशेल अपयश येताना दिसत आहे. वाढत्या घटनांमुळे शहर पोलिसांचा धाक संपला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न चिंताजनक बनत चालला आहे. मुकुंदवाडी भागात गेल्या महिन्यात क्षुल्लक कारणावरून चिकन शॉपमधील सुरा, कोयत्याने तीन तरुणांवर सहा जणांनी सपासप वार करून एकाची निघृण हत्या केली होती.
घटनेनंतर अतिक्रमण पाडण्यासाठी मनपासह पोलिस यंत्रणा रस्त्यावर उतरली. मात्र रस्त्यावर, वाईन शॉपसमोर, मोकळ्या मैदानावर सर्रासपणे नशेखोर, दारुडे यथेच्छ नशापाणी करताना आजही दिसून येतात. गुन्हेगारीचे मूळ नशेखोरीत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झालेले आहे. चाकू, तलवारच काय पिस्तूल सारखे घातक शस्त्र बाळगून गुन्हेगार दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही धाक राहिलेला नाही.
१७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एमआयडीसी वाळूज भाग सर्वाधिक धोकादायक ठरला आहे. तिथे ३ खून, १२ खुनाचे प्रयत्न, १३ घरफोड्या आणि १३६ चोरीच्या घटना घडल्या. त्यातील उघडकीचा दर अत्यंत कमी आहे. दुसरीकडे घरफोडी, चोऱ्या रोखण्यात शहर पोलिस अपयशी ठरताना दिसत असून, घडलेल्या घटनांच्या तपासाचा वेग कासव गतीने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांनी २७ अंमलदारांची गुन्हे शाखेत बदली केली. त्यामुळे गुन्हे शाखेचे बळ वाढले असले तरी कितपत गुन्हे उघडकीस येतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
तोतया पोलिसांनी सहा महिन्यांत तब्बल १४ जणांचे लाखोंचे दागिने लुबाडून नेले. यातील एकही गुन्हेगार पोलिसांना पकडता आलेला नाही. जवाहरनगर हद्दीत सर्वाधिक ४ घटना घडल्या. वृद्ध नागरिकांना ही टोळी टार्गेट करते. पुंडलिकनगर, सिडको, क्रांती चौक हद्दीत प्रत्येकी २ घटना तर सिटी चौक, छावणी, मुकुंदवाडी आणि उस्मानपुऱ्यात प्रत्येकी एक घटना घडली.
गेल्या सहा महिन्यांत शहरात ३४ मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या. यातील केवळ ८ गुन्हे उघडकीस आले. सर्वधिक ८ घटना जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत घडल्या. त्यानंतर पुंडलिकनगर, सातारा, उस्मानपुरा प्रत्येकी ६ तसेच क्रांती चौक, छावणी प्रत्येकी २ तर हसूल, जिन्सी, एम. सिडको, वाळूज प्रत्येकी एक घटना घडली. सिटी चौक, बेगमपुरा, वेदांतनगर, एम वाळूज, दौलताबाद, सिडको मुकुंदवाडीत एकही घटना नाही.