खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत मुठा खोऱ्यात सोमवारी (दि. २०) सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत ०.४१ टीएमसी पाण्याची भर पडली. धरण साखळीत सायंकाळी पाच वाजता १७.६७ टीएमसी म्हणजे ६०.६३ टक्क्यांवर पोहोचली.
वरसगाव येथे दिवसभरात सर्वांत अधिक ५४, तर पानशेत येथे ५२, टेमघर येथे ४४ व खडकवासला येथे ५ मिलीमीटर पाऊस पडला. खडकवासला परिसरात पावसाचा जोर कमी आहे. वरसगाव, टेमघर व पानशेत धरण माथ्यापेक्षा धरणक्षेत्रातील घाटमाथ्यालगतच्या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. या परिसरात अधूनमधून सरी कोसळत आहेत.
त्यामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाळी वातावरण होते; मात्र, जोरदार पाऊस नव्हता. त्यामुळे धरणसाठ्यातील वाढ मंदावली होती. धरणसाखळीत रविवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजता १७.२६ टीएमसी पाणी होते.
खडकवासला धरण पुन्हा भरणार
खडकवासला धरणमाथ्यावर तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पानशेत, वरसगाव, टेमघर धरणमाथ्याखालील मुठा-मोसे खोऱ्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खडकवासलात पाण्याची आवक गेल्या दहा दिवसांत प्रथमच वाढली आहे. खडकवासलातून पिण्यासाठी मुठा कालवा व बंदिस्त जलवाहिन्यांतून १५२७ क्सुसेक पाणी सोडले जात आहे. मोसे-मुठा खोऱ्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास खडकवासला धरण पुन्हा भरण्याची शक्यता आहे.
धरणे लवकरच भरण्याची शक्यता
पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांतून पाणी सोडले जात नाही. तिन्ही धरणांत शंभर टक्के साठा केला जाणार आहे. सध्या पडत असलेल्या पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन आठवड्यांत तिन्ही धरणे ८० ते ९० टक्के भरण्याची शक्यता खडकवासला जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.