Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Water Level: खडकवासला धरणसाखळी ९८ टक्के भरली; पावसाचा जोर ओसरताच विसर्ग ८५६ क्युसेकवर कमी

पूरस्थितीचा धोका टळला; मुठा नदीकाठावरील नागरिकांना दिलासा, टेमघर धरण शंभरीच्या उंबरठ्यावर

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी (दि. १) सकाळपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग दुपारी चार वाजता टप्प्याटप्प्याने कमी करून ८५६ क्युसेक करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता चार धरणांच्या या प्रकल्पात २८.६१ टीएमसी म्हणजेच ९८.१७ टक्के पाणीसाठा झाला होता.

गतवर्षी १ ऑगस्ट २०२५ रोजी धरणसाखळीत २५.५६ टीएमसी (८७.७० टक्के) पाणीसाठा होता. यंदा धरणसाखळीत सुमारे ११ टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. टेमघर धरणात सध्या ३.३३ टीएमसी (८९.७८ टक्के) पाणीसाठा असून, ते शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

टेमघर येथे शनिवारी दिवसभरात ४५, वरसगाव व पानशेत येथे प्रत्येकी २५ मि.मी., तर खडकवासला येथे ५ मि.मी. पावसाची नोंद झाली. मोसे, मुठा आणि आंबी नद्यांतील पूरही ओसरल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याचा वेग कमी झाला आहे. घाटमाथा आणि धरण परिसरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू असून, अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. तसेच, जोरदार वारे वाहत असल्याने पावसाचे ढग विरळ होत असल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी (दि. ३१) झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणातून दुपारी तीन वाजता तब्बल ४३ हजार ५७१ क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. पावसाचा जोर कायम राहिल्यास गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कर्मचारी धरणांवर तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनासह मुठा नदीकाठावरील नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण होते. मात्र, सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पूरस्थितीने उग्र रूप धारण केले नाही. त्यामुळे सिंहगड रस्ता, उत्तमनगर, नांदेड, कोंढवे-धावडे आदी भागांतील हजारो नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वरसगाव आणि पानशेतचा विसर्गही घटवला

धरणांतील पाण्याची आवक कमी झाल्याने वरसगाव आणि पानशेत धरणांचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. सध्या वरसगाव धरणातून १,२३७ क्युसेक, तर पानशेत धरणातून ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT