Khadakwasla Dam Pudhari
पुणे

Khadakwasla Dam Overflow: खडकवासला धरणसाखळी ओव्हरफ्लो; चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा, विसर्ग सुरू

टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरले; पुणे शहरासह ६६ हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: घाटमाथ्यासह पानशेत मुठा खोऱ्यात पावसाची रिमझिम सुरू असल्याने शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांची, तसेच हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यांतील ६६ हजार हेक्टर शेतीची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांतून विसर्ग सुरू आहे. मंगळवारी (दि.४) टेमघर धरण शंभर टक्के भरल्याने धरण साखळी ओव्हरफ्लो झाली आहे.

पाण्याची आवक कमी झाल्याने बुधवारी (दि. ५) दुपारी दीड वाजता खडकवासलातील मुठा नदीच्या पात्रातील विसर्ग आठ हजार ७७७ क्‍युसेकपर्यंत कमी करण्यात आला. २९.१५ टीएमसी क्षमतेच्या धरण साखळीत शंभर टक्के साठा आहे. धरण क्षेत्रासह घाटमाथ्यावर बुधवारी सकाळपासून रिमझिम पावसासह हलक्या सरी पडत आहेत.

खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, वरील तिन्ही धरणे भरून वाहत असल्याने पाण्याची भर खडकवासलात पडत आहे. पानशेत धरणातून तीन हजार ७९६, वरसगावमधून तीन हजार ५७७ व टेमघरमधून ९४२ क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत खडकवासलातून मुठा नदीतून ९.७५ म्हणजे जवळपास दहा टीएमसीपेक्षा जादा पाणी सोडले. या पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे.

तर, गेल्या महिनाभरात धरणातून मुठा कालवा व बंदिस्त जलवाहिन्यातून अडीच टीएमसीपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले आहे. एवढे पाणी सोडूनही सततच्या पावसामुळे धरण साखळी फुल्ल‍ आहे. सोमवारी (दि.३) धरण क्षेत्रात संततधार सुरू होती. त्यामुळे खडकवासलातून मुठा नदीच्या विसर्गात दुपारी तीन वाजता २९ हजार ११७ क्‍युसेकपर्यंत वाढ करण्यात आली.

सायंकाळपासून पावसाचा जोर ओसरू लागला. त्यामुळे मध्यरात्री बारा वाजल्यापासून खडकवासलासह पानशेत व वरसगावचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. पावसाचे प्रमाण पाहून पाण्याचा विसर्ग कमी - जास्त केला जात आहे. बुधवारी दिवसभरात टेमघरमध्ये १८, वरसगाव मध्ये १५, पानशेतमध्ये १८ व खडकवास लामध्ये १४ मिलिमीटर पाऊस पडला.

धरणसाखळी फुल्‍ल

जून कोरडा, जुलैमध्ये धरण साखळी फुल्‍ल गतवर्षी आजच्या दिवशी ५ ऑगस्ट २०२५ रोजी धरण साखळीत २५.९२ टीएमसी म्हणजे ८८.९३ टक्के साठा होता. यंदा जून महिना कोरडा जाऊनही जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरण साखळी फुल्ल झाली आहे.

बुधवारी सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे खडकवासलात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने दुपारी मुठा नदीपात्रातील विसर्ग कमी करण्यात आला. पावसाच्‍या प्रमाणानुसार विसर्ग कमी- जास्त केला जात आहे.
विरेश राऊत, शाखा अभियंता, खडकवासला धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT