खडकवासला: रायगड जच्या हद्दीवरील घाट माथ्यासह पानशेत, वरसगाव, टेमघर धरण क्षेत्रात मंगळवारी संततधार पाऊस सुरू झाला. पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला धरणातून दुपारी चारनंतर 1 हजार 730 क्युसेकने मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात आला. जोरदार पावसाची शक्यता असल्याने जादा पाणी मुठा नदीत सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणसाखळीत मंगळवारी सायंकाळी पाच वाजता 22.07 टीएमसी म्हणजे 75.73 टक्के साठा झाला होता. गेल्या 24 तासांत पाणीसाठ्यात 0.68 टीएमसी वाढ झाली. सोमवारी (दि. 14) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 21.34 टीएमसी पाणी होते. (Latest Pune News)
मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 11 तासांत टेमघर येथे सर्वाधिक 63 मिलीमीटर पाऊस पडला. याच कालावधीत पानशेत व वरसगाव येथे प्रत्येकी 35, तर खडकवासला येथे 22 मिलीमीटर पाऊस पडला.
वरसगाव धरण विभागाच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण म्हणाल्या, रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पाण्याची आवक वाढल्याने वरसगाव, पानशेतच्या पाणीपातळीत वाढ सुरू आहे. दिवसअखेर वरसगाव 80, तर पानशेतमध्ये 74 .73 व टेमघरमध्ये 70 टक्के साठा झाला. पाण्याची आवक सुरू असल्याने जलसंपदा विभाग सतर्क झाला आहे. चारही धरणांवर अधिकारी तळ देऊन आहेत.
खडकवासला धरण विभागाच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर-फुटाणे म्हणाल्या की, खडकवासला धरणाची पाणीपातळी 63 टक्क्यांहून अधिक झाली आहे. सध्या 1730 क्युसेक पाणी खडकवासलातून मुठा नदीत सोडले जात आहे. पाण्याची आवक वाढल्यास जादा पाणी नदीत सोडले जाणार आहे. नदीकाठच्या रहिवाशांसह संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
मंगळवारचा पाणीसाठा
22.07 टीएमसी (75.73 टक्के)