

पुणे: महापालिकेची जागा वापरायची की राज्य शासनाच्या अनुदानातून भाडेतत्त्वावर घ्यायची, या वादात ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना हवेत विरत आहे. महापालिकेने आत्तापर्यंत 25 जागांपैकी केवळ एका जागेवर, तर राज्य शासनाच्या 33 जागांपैकी केवळ 10 जागांवर आपला दवाखाना सुरू झाला आहे. इतर जागांबाबत महापालिका आयुक्त येत्या आठवड्यात आरोग्य, भवन आणि विद्युत या विभागांची बैठक घेणार आहेत.
राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी 58 जागा निश्चित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली. महापालिकेने जागा भाडेतत्त्वावर घ्याव्यात आणि त्यासाठी लागणारी 1 लाख रुपयांची रक्कम राज्य शासन देणार असल्याचा निर्णय झाला होता. (Latest Pimpri News)
जागा भाड्याने घेण्याऐवजी महापालिकेच्या जागांवरच ‘आपला दवाखाना’ सुरू करावा, अशी कल्पना तत्कालीन महापालिका आयुक्तांनी मांडली. राज्य शासनाकडून दिले जाणारे अनुदान साधनसामग्री, फर्निचर, डागडुजीसाठी वापरण्याबाबत विचार झाला. मात्र, या प्रस्तावास राज्य शासनाने नकार दिला. त्यामुळे महापालिकेने 25 जागांवर आपला दवाखाना सुरू करावा, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले.
राज्य शासनाकडून उर्वरित 33 जागांवर ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. सध्या महापालिकेच्या 25 जागांपैकी केवळ 1 तर राज्य शासनाकडून 33 पैकी केवळ 10 ठिकाणी दवाखाने सुरू झाले आहेत. जागेच्या वादामुळे आपला दवाखाना संकल्पना वार्यावर सोडण्यात आली आहे. महापालिकेतर्फे केवळ वाघोलीमध्येच आपला दवाखाना सुरू आहे.
काय आहे ’आपला दवाखाना’ संकल्पना?
सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सुविधा देऊन त्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य योजनेअंतर्गत ‘आपला दवाखाना’ हा उपक्रम राबविला जात आहे.
झोपडपट्टी परिसरात आणि दुर्गम भागामध्ये राहणार्या नागरिकांना तब्येतीच्या लहानसहान तक्रारींसाठी महापालिकेचा दूरचा दवाखाना गाठावा लागू नये, यासाठी वस्त्यांमध्ये ‘आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे.
महिन्यातील एक दिवस ठरवून नेत्रतपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्ततपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनसेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञसंदर्भसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून ‘आपला दवाखाना’ सुरू झाल्यास नागरिकांना मोफत उपचार, औषधे मिळणार आहेत.
कुठे सुरू आहे आपला दवाखाना?
महापालिकेचा आपला दवाखाना: वाघोली
राज्य शासनातर्फे सुरू झालेले दवाखाने: धानोरी, खांडवेनगर, कलवड रस्ता, टिंगरेनगर, स्वारगेट चौक, गुजर-निंबाळकरवाडी (कात्रज तलाव), ताडीवाला रस्ता, केशवनगर, उत्तमनगर, वाघोली-लोहगाव रस्ता .
‘आपला दवाखाना’साठी शहरात 25 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा एक प्रस्ताव राज्य शासनाला, तर एक प्रस्ताव आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. इतर 33 ठिकाणी राज्य शासनातर्फे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचा सर्वाधिक फायदा कष्टकरी, बांधकाम मजूर, विक्रेते, अशा विविध घटकांना होणार आहे.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका