खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत - वरसगाव खोर्यात मान्सून सक्रिय झाला आहे. या भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या 24 तासांत धरणसाठ्यात अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची भर पडली. त्यामुळे शुक्रवारी (दि. 25) खडकवासला धरणसाखळीत 24.33 टीएमसी म्हणजे 83.45 टक्के पाणीसाठा झाला होता.
पानशेत वरसगाव टेमघर धरणक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासूनच रिमझिमीसह संततधार पाऊस पडत होता. खडकवासला सिंहगड भागात हलका पाऊस पडला. या पावसामुळे ओढे नाल्यांतून पाण्याची आवक वाढली. त्यामुळे चारही धरणात पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. (Latest Pune News)
दरम्यान, धरणसाखळीत गुरुवारी (दि. 24) सायंकाळी पाच वाजता 23.78 टीएमसी पाणी होते. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरात टेमघर येथे 27, वरसगाव येथे 15, पानशेत येथे 18 व खडकवासला येथे 2 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत, वरसगाव धरण खोर्यातील दापसरे, शिरकोली, आडमाळ, तव धामण ओहोळ, साईव बुद्रुक,मोसे आदी ठिकाणी संततधार पाऊस पडला. त्यामुळे धरणसाखळीत पाण्याची वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात शुक्रवारी चांगला पाऊस पडला. अधूनमधून सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ सुरू आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर शनिवारपर्यंत वरसगाव धरण 90 टक्के भरण्याची शक्यता आहे, असे वरसगाव धरण विभागाच्या शाखा अभियंता प्रतिक्षा रावण यांनी सांगितले.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी
शुक्रवारचा पाणीसाठा
24.33 टीएमसी (83.45 टक्के)