खडकवासला: पानशेत-आंबी परिसरात हरीण, भेकर, ससे, मोर, लांडोर आदी वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. तीव उन्हामुळे जंगलात पाण्याचे तसेच खाद्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे शेजारच्या रानात, शेतात वन्यजीव खाद्य-पाण्यासाठी नियमितपणे संचार करताना दिसत आहेत.
पानशेतजवळील आंबी (ता. हवेली)मध्ये सरकारी वनक्षेत्र नाही. मात्र, आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र, जंगल, झुडपे आहेत. त्यामुळे आंबी येथील वरपेवाडी, कळकाईदरा, रुळे (ता. राजगड) येथील भोपळटोंग, सोनापूर आदी ठिकाणी वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढल्याचे दिसून येत आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून उन्हाळ्यात आंबीमध्ये हरीण, काळवीट असे प्राणी खाद्य- पाण्यासाठी येत आहेत. गाई-वासरे अशा जनावरांबरोबर ते हिरवा चारा खाताना दिसत आहेत. तेथे पाणी पिऊन रात्रभर मुक्काम करून सकाळी लवकर पुन्हा जंगलात जात आहेत. सध्या आंबीमध्ये चितळ जातीच्या हरिणांची नर व मादी अशी जोडी फिरत आहे.
स्थानिक शेतकरी गणेश विठ्ठल निवंगुणे यांच्या गाई गुरांसमवेत हरिणाची जोडी चारा खाऊन शेजारच्या बाबुंच्या बेटात मुक्काम करत आहेत. जनावरांनाही या हरिणांच्या जोडीचा लळा लागला आहे.खडकवासला-पानशेत परिसरात वन्यजीवांचा मुक्त संचार; हरिणांचे शेतात दर्शन वाढले
आंबीच्या परिसरात मोठ्या जंगल वनराई आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. जंगलातील वन्यप्राणी चारा-पाण्यासाठी स्थलांतर करून शेजारच्या रानात येत आहेत. हरीण, भेकर, ससे आदी वन्यजीवांचा शेतकऱ्यांना उपद्रव होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वन्यजीवांना उपद्रव करू नये.समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग
मोकाट कुत्र्यांच्या झुंडी हरणावर धावून येतात. मात्र, नर हरीण कुत्र्यांचा पाठलाग करत त्यांना पिटाळून लावतात. शेतकऱ्यांना हरिणांची गोडी लागली आहे.शंकरराव निवंगुणे, स्थानिक शेतकरी