पुणे: केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी लोहगडासह लोणावळा परिसरातील उंच ठिकाणे आणि दऱ्यांची पाहणी करून 'स्पॉट' निश्चित करण्यात आला. एवढेच नव्हे, तर लोहगडावरून पडून झालेल्या एका तरुणीच्या मृत्यूची माहिती तसेच देशभर चर्चेत आलेल्या सोनम रघुवंशी हत्या प्रकरणाचाही इंटरनेटवर अभ्यास करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात तब्बल ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सिया प्रवीण गोयल, चेतन बाबूलाल चौधरी आणि रितेश संजय हंगे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविले असून, काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब कलम १६४ अन्वये नोंदविण्यात आले आहेत. काही साक्षीदारांनी सिया आणि चेतन यांना गुन्ह्याशी संबंधित हालचाली करताना पाहिल्याचे तपासात समोर आले आहे. संशयितांच्या मोबाईलमधील डेटा, व्हॉट्सॲप संभाषणे, छायाचित्रे, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), तांत्रिक विश्लेषणाचे अहवाल व प्रमाणपत्रे आणि विविध कागदपत्रांचा पुराव्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
‘माही’च्या नावाने केतनला बोलावले
केतनला लोहगडावर तिसऱ्यांदा बोलावण्यासाठी 'माही' नावाने बनावट समाज माध्यम खाते वापरण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सियाची मैत्रीण असल्याचे भासवून तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने केतनला लोहगडावर बोलावण्यात आले आणि त्यानंतर हत्येचा कट अमलात आणण्यात आल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
आधी इंटरनेटवर ‘होमवर्क’
दोषारोपपत्रानुसार, सिया आणि चेतन यांनी मार्च २०२५ मध्ये नव्या सांगवीतील एका २१ वर्षीय तरुणीचा लोहगडावरून पडून झालेल्या मृत्यूची माहिती इंटरनेटवर शोधली होती. देशभर चर्चेत आलेल्या सोनम रघुवंशी हत्या प्रकरणाची माहितीही त्यांनी अभ्यासल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय गुन्हेगारी घटना आणि हत्या दाखविणारे चित्रपट पाहिल्याचेही दोषारोपपत्रात नमूद आहे.
हत्येपूर्वी लोणावळ्यात रेकी
केतनच्या हत्येसाठी लोणावळ्यातील विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. २१ मे रोजी टायगर पॉइंटसह उंच ठिकाणे आणि दऱ्यांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ३१ मे रोजी सिया चेतनला लोहगडावर घेऊन गेली. याच वेळी केतनला नेमक्या कोणत्या ठिकाणाहून ढकलायचे, ती जागा निश्चित करण्यात आल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.
रितेश हंगेची ‘सल्लागार’ भूमिका
केतनचे हात-पाय तोडायचे की अन्य व्यक्तीकडून त्याची हत्या करून घ्यायची, यासंदर्भातील चर्चेत रितेश हंगे सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. गुन्ह्यानंतर पोलिसांच्या कारवाईपासून कसे वाचायचे, घटनास्थळी सीसीटीव्ही नसण्याची खबरदारी आणि मोबाईलचा वापर कसा टाळायचा, याबाबत हंगेने सिया आणि चेतनला मार्गदर्शन केल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.