पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून जप्त केलेल्या तिन्ही मोबाईलमधील डेटा पोलिसांनी यशस्वीरीत्या रिकव्हर केला आहे. या डिजिटल पुराव्यांची साक्षीदारांच्या जबाबांशी सांगड घालून तपास अधिक भक्कम करण्यावर पुणे ग्रामीण पोलिसांचा भर असून, त्यातून हत्येच्या कटासंदर्भातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली, तरी पोलिसांनी तपासाची गती कायम ठेवली आहे. आरोपींच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू असून, त्यांचे जबाब नोंदविण्याचे कामही सुरू आहे.
तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण केले जात आहे. या माहितीच्या आधारे आरोपींच्या हालचाली, त्यांचे परस्परसंपर्क तसेच हत्येच्या कटाशी संबंधित बाबींची शहानिशा केली जात आहे. डिजिटल पुराव्यांमधून समोर येणाऱ्या प्रत्येक माहितीची साक्षीदारांच्या जबाबांशी पडताळणी केली जात असून, त्यामुळे तपासाला अधिक बळ मिळत आहे.
दरम्यान, आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी परस्परांशी सांकेतिक भाषेत (कोड लँग्वेज) केलेल्या चॅटची उकल करण्याचे कामही सुरू आहे. तसेच, दोघांच्या संपर्कातील काही मित्रांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिसांनी नोंदविणे सुरू केले असून, त्यांच्याकडून तपासासाठी महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. केतन अग्रवालच्या खुनाच्या कटाची माहिती चेतन चौधरीच्या एका वर्गमित्रालाही होती. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता. हत्येच्या नियोजनाबाबत चेतन आणि सिया यांनी त्याच्याशी चर्चा केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. संबंधित तरुण १८ जून रोजी लोहगडावर गेला नव्हता. मात्र, केतनची हत्या झाल्यानंतर चेतनने सर्वप्रथम त्याच मित्राची भेट घेतल्याचे तसेच सियानेही त्याच्याशी संपर्क साधल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी संबंधित तरुणाचा जबाब नोंदविला असून, त्याने चेतन आणि सिया यांना केतनचा खून करू नका, असा सल्ला दिल्याचे तपासातून समोर आले आहे. या कटाची माहिती आणखी कोणाला होती का? याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणातील घटनाक्रमाशी संबंधित काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाबही पोलिसांनी नोंदविले आहेत. त्यांच्या माहितीमुळे तपासाला आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची अपेक्षा आहे. सिया आणि चेतन यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची चौकशीही सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दिली.