

परिंचे: गेल्या दोन दिवसांपासून पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवस ढगांकडे आशेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे हास्य फुलले असून, खरीप हंगामाबाबत नव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.
जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने बाजरी, ज्वारी, मका, तूर, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग येणार आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असून, उर्वरित शेतकरी देखील शेतात उतरले आहेत. शिवारात पुन्हा एकदा शेतीकामांची लगबग सुरू झाल्याचे उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळत आहे. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत होता; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांतील सततच्या पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसामुळे विहिरी, शेततळी, ओढे आणि लहान नाल्यांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची चिन्हे आहेत. कृषी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याने ग्रामीण अर्थचक्रालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तथापि, कृषितज्ज्ञांच्या मते खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी पुढील काही आठवड्यांतही नियमित आणि संतुलित पाऊस आवश्यक आहे. सध्याचा पाऊस आशादायी असला, तरी सातत्य राखणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यावर्षी पुरंदर तालुक्यात मोसमी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिके जगवणे मुश्कील झाले होते. उशिरा का होईना वरुणराजाने कृपादृष्टी केल्यामुळे आम्हाला खरीप हंगामातील कडधान्याची पिके तसेच तरकारी पिके घेता येणार आहेत. निसर्गाने पावसाचे दान असेच भरभरून द्यावे.
ऋषीकेश धुमाळ, शेतकरी, वीर
दोन दिवसांच्या पावसाने केवळ जमीनच भिजली नाही, तर बळीराजाच्या आशाही पुन्हा हिरव्यागार झाल्या आहेत. असाच सातत्यपूर्ण पाऊस चालू राहिल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. पेरण्यांना उशीर झाला असला, तरी सध्याच्या पावसाने जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला लागावे.
संदीप कदम, उप कृषी अधिकारी, पुरंदर तालुका