Ketan Agarwal Murder Case Pudhari
पुणे

Ketan Agrawal Murder Case:सिया-चेतनने ४ महिन्यांपूर्वीच केलं होतं गुपचूप लग्न! केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

दोघांच्‍या व्‍हॉटसॲप चॅटच्‍या तपासात धक्‍कादायक माहिती समोर

पुढारी वृत्तसेवा

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल खून प्रकरणी एक अत्यंत मोठा खुलासा समोर आला आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी तब्बल चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केले होते. पोलिसांना मिळालेल्या दोघांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्‍ये धक्‍कादायक माहिती समोर

१८ जून रोजी केतन अग्रवाल याची लोहगडावरून ढकलून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हा अपघात असल्‍याची नोंद झाली. मात्र पोलिसांनी सखोल तपास करत सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली होती. सुरुवातीला हे केवळ प्रेमप्रकरणातून झालेली हत्या असल्याचा संशय होता; मात्र पोलिसांनी जेव्हा आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून तपास केला, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून त्यांनी चार महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत

केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचल्याच्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली सिया आणि चेतन सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली, तरी पोलिसांनी तपासाची गती कायम ठेवली आहे. आरोपींच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू असून, त्यांचे जबाब नोंदविण्याचे कामही सुरू आहे.

पोलिसांनी मोबाईलमधीलडेटा यशस्वीरीत्या केला रिकव्हर

केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून जप्त केलेल्या तिन्ही मोबाईलमधील डेटा पोलिसांनी यशस्वीरीत्या रिकव्हर केला आहे. या डिजिटल पुराव्यांची साक्षीदारांच्या जबाबांशी सांगड घालून तपास अधिक भक्कम करण्यावर पुणे ग्रामीण पोलिसांचा भर आहे. तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण केले जात आहे. या माहितीच्या आधारे आरोपींच्या हालचाली, त्यांचे परस्परसंपर्क तसेच हत्येच्या कटाशी संबंधित बाबींची शहानिशा केली जात आहे. डिजिटल पुराव्यांमधून समोर येणाऱ्या प्रत्येक माहितीची साक्षीदारांच्या जबाबांशी पडताळणी केली जात असून, त्यामुळे तपासाला अधिक बळ मिळत आहे.

केतन अग्रवाल याची लोहगडावरून ढकलून हत्या

केतन आणि सिया यांचा ११ फेब्रुवारी २०२६ रोजी साखरपुडा झाला. यानंतर दोघे फिरायला जात असत. केतनला ट्रेकिंगचा छंद होता. त्याने सियाला ट्रेकिंगसाठी लोहगड किल्ल्यावर जाण्यास सांगितले. इथेच सियाला केतनच्या हत्येचा कट रचला. सियाने १८ जून रोजी केतनला प्री-वेडिंग फोटोशूटच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी राजी केले. यावेळी चेतनही त्यांच्यासोबत होता. एका ठिकाणी जेव्हा केतन डोंगरांकडे पाहत होता, तेव्हा दोघांनी त्याला मागून धक्का दिला. केतनचा जागीच मृत्‍यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT