Vishal Agarwal Pudhari
पुणे

Lohagad Case Fast Track Court: केतन अगरवाल प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची कुटुंबाची मागणी

कट रचून खून झाल्याच्या आरोपानंतर आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी करत अगरवाल कुटुंबाने न्यायासाठी सरकारकडे धाव घेतली आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: 'आमचा एकुलत्‍या एका मुलगा गेला. आता आयुष्यात दु:खाशिवाय काही उरलेले नाही. केतनचा कोणताही दोष नसताना त्याचा जीव घेण्यात आला. सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल," अशा शब्दांत लोहगड हत्याकांडातील मृत केतनचे वडील विशाल अगरवाल व कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी घडलेल्या घटनेत केतन अगरवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून पाहिले जात असलेल्या या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासादरम्यान धक्कादायक खुलासा करत केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून त्याचा खून केल्‍याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अगरवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यांपूर्वीच केतनचा साखरपुडा झाला होता. घरात लग्नाची तयारी सुरू होती. भविष्यातील स्वप्ने रंगवणाऱ्या कुटुंबाला अचानक अंत्यसंस्काराची वेळ येईल, याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे कुटुंबीय अद्याप या धक्क्यातून सावरू शकले नाही.

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेला विलंब होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत अगरवाल कुटुंबाने हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला

विशाल अगरवाल यांनी सांगितले की, 'आम्ही गोयल कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखत होतो. हे लग्न ठरवून देणाऱ्या मित्तल दाम्पत्याशीही आमचे जुने संबंध होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही हे नाते स्वीकारले. मात्र, ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्याकडूनच असा विश्वासघात होईल, याची कल्पनाही केली नव्हती.'

अन् शंकेचे रूपांतर भीषण गुन्ह्यात झाले

केतनच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्याने आपल्या वडिलांकडे मन मोकळे केले होते. 'बाबा, ती माझ्यापासून काही तरी लपवतेय,' असे त्याने सांगितल्याचे अगरवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. त्यावेळी कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली होती. मात्र, त्याच शंकेचे रूपांतर अखेर एका भीषण गुन्ह्यात झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT